Director Chandra Barot Passes Away :बॉलीवूड मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते चंद्रा बारोट यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारासाठी उपचार सुरू होते. दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्या पत्नी दीपा बारोट यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गुरुनानक रुग्णालयात डॉ. मनीष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बारोट यांच्यावर उपचार सुरू होते. माहितीनुसार, चंद्रा बारोट फुफ्फुसांच्या काही समस्यांमुळे गेल्या ६-७ वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९७८ मध्ये चंद्रा बारोट यांनी ‘डॉन’ या चित्रपटातून स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.
चंद्रा बारोट यांच्या ‘डॉन’ने सुरुवातीला फारशी कमाई केली नव्हती. मात्र, नंतर अनेकांकडून या चित्रपटाने मौखिक लोकप्रियता मिळवली आणि ‘डॉन’ यशस्वी झाला, यामुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचले. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’ तसंच ‘डॉन’ अशीही ओळख मिळाली.
‘डॉन’नंतर बारोट यांनी १९८९ मध्ये बंगाली चित्रपट ‘आश्रिता’ आणि १९९१ मध्ये हिंदी चित्रपट ‘प्यार भरा दिल’ दिग्दर्शित केला, पण ‘डॉन’सारखे यश त्यांना पुन्हा मिळाले नाही, त्यामुळे त्यांना ‘वन हिट वंडर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
‘डॉन’च्या यशानंतर बारोट यांना तब्बल ५२ चित्रपटांची ऑफर मिळाली, पण त्यातले फार थोडेच चित्रपट पूर्ण होऊ शकले. ‘बॉस’ आणि ‘नील को पकडना… इम्पॉसिबल’सारखे काही चित्रपट अपूर्ण राहिले किंवा ते प्रदर्शितच झाले नाहीत. चंद्रा बारोट यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे