This Bollywood Actor Praises Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. फक्त प्रेक्षकच नव्हे तर कलाकारही त्यांचे चाहते आहेत. पण त्यांना हे सर्व खूप मेहनत केल्यानंतर मिळालं. व्यवसायिक आयुष्यासह त्यांच्या खासही जीवनातही अनेक चडउतार आले. परंतु, कलाकार म्हणून ते अनेकांची मनं जिंकत राहिले. अशातच लोकप्रिय अभिनेत्यानेही त्यांचं कौतुक केलं आहे.
हल्ली अनेक कलाकार अभिनयासह स्वत:चा व्यवसाय करताना दिसतात. असाच काहीसा प्रयत्न बिग बी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा केलेला. त्यांनी त्यांची अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ही निर्मिती संस्था सुरू केलेली. परंतु, यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठी अडचण निर्माण झालेली. या व्यवसायत त्यांना अपयश मिळालं. परंतु, तरीसुद्धा याचा त्यांनी त्यांच्या व्यवसायिक आयुष्यावर परिणाम होऊ दिला नाही. त्यावेळी त्यांच्यासह चित्रपटात काम केलेले अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
आशिष विद्यार्थी यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याचा अनुभव
आशिष यांनी सिद्धार्थ कननला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी बिग बींसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले, “मी त्यांच्यासह ‘मृत्यूदाता’ चित्रपटात काम केलं होतं. ती आठवण मी कधीच विसरू शकत नाही. या चित्रपटातून त्यांनी कमबॅक केलं होतं. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, माझ्या वडिलांचं खूप वय झालं होतं आणि माझ्या आईला ह्रदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे रोज शूटिंग संपल्यानंतर मी मुंबईहून विमानाने दिल्लीला तिच्याकडे जात असत. त्यावेळी मी अमिताभ यांना माझ्या आईसाठी एक पत्र लिहाल का अशी विनंती केली होती. जे मी नंतर माझ्या आईला वाचून दाखवलं”.
आशिष पुढे दुसऱ्या एका चित्रपटात अमिताभ यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाले, “मी त्यांच्यासह ‘मेजर साब’ या चित्रपटातही काम केलं. त्यांची कामाप्रती असलेली शिस्त कौतुकास्पद आहे. एरवी लोक शॉट दिल्यानंतर सीनच्यामध्ये लावलेली खोटी मिशी, दाढी किंवा इतर गोष्टी काढून ठेवतात पण ते त्या भूमिकेच्या लूकमध्येच असायचे. अगदी रात्रीसुद्धा. त्यामुळे जर कधीही कोणाला आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडत नसतील म्हणून वाईट वाटत असेल तर अमितजी त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहारण आहे.”
आशिष विद्यार्थी यांनी अमिताभ बच्चन यांचं केलं कौतुक
“इंडस्ट्रीतील लोक काम मिळत नाही, एकटे पडले म्हणून तक्रारी करतात. पण त्यांच्याकडे बघा एकेकाळी देशभरातील सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता. ते आजारी होते तेव्हा लोक जेवायचे नाही. जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा हार न मानता, खचून न जाता त्यांनी त्याचा सामना केला आणि त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही.”
आशिष पुढे अमिताभ यांच्याबद्दल म्हणाले, “आजही त्यांची कामाप्रती तशीच निष्ठा असून आजही कामाच्याबाबतीत ते तितकेच शिस्तप्रिय आहेत.” त्यांनी अमिताभ यांच्यासह ‘गुडबाय’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी ‘गुडबाय’ चित्रपटात त्यांच्यासह शेवटचं काम केलं होतं. त्यावेळी ते दिग्दर्शकाकडून सल्ला घ्यायचे, नेहमी वेळेवर यायचे, दिग्दर्शकाला जर अजून एखादा शॉट घ्यायचा असेल तर त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे.”