Amitabh Bachchan Health Updates : वयाची सत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन आजही तितक्याच जोमाने कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत. बिग बी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘प्रोजेक्ट के’. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. याचदरम्यान अमिताभ यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. हैदराबादमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना त्यांना दुखापत झाली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली”.

“आता मी माझ्या घरी परतलो आहे. जखमी जागेवर पट्टी बांधण्यात आली आहे. शिवाय औषधोपचारही सुरू आहेत. वेदनाही होत आहे. हालचाल करण्यासाठी तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. प्रकृती सुधारण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागेल. या गंभीर दुखापतीमुळे माझी इतर कामही सध्या बंद आहेत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “जोपर्यंत मी ठिक होत नाही तोपर्यंत माझं काम बंद राहील. सध्यातरी मी जलसामध्ये (मुंबईमधील अमिताभ यांचा बंगला) आराम करत आहे.” तसेच अधिक त्रास होऊ नये म्हणून अमिताभ पूर्णपणे आराम करणार आहेत. शिवाय चाहत्यांना भेटण्यासाठी ते जलसा बंगल्याबाहेरही या आठवड्यामध्ये येणार नाहीत. सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.