Amitabh Bachchan Post: अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते रोज फेसबूक व एक्सवर पोस्ट करत असतात. आता त्यांनी मराठी भाषेबद्दल एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सही केल्या आहेत.
महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रातीयांवर मराठी भाषेत बोलण्याचा दबाव टाकला जातोय, अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याने काही जणांनी वाद घातल्याचे काही व्हिडीओही पाहायला मिळाले होते.
इतकंच नाही तर महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी आलीच पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केले होते. आता मराठीबद्दल अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केली आहे. मराठी शिकण्याचा प्रयत्न करण्याबद्दल ही पोस्ट आहे.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट
“कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे,” असं अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याने काही नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी त्यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांना ट्रोल केलं आहे. गुगल ट्रान्सलेट केलं आहे, चॅट जीपीटी वापरलं आहे, असं काहींनी म्हटलं आहे.


‘मराठी तुम्ही शिकत आहात, त्या बद्दल आभार,’ ‘हे जर खरंच तुम्ही लिहिलं असेल तर तुम्ही मराठी शिकला आहात.. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे,’ ‘तुम्ही हे गूगल ट्रान्सलेटरमधून भाषांतर केलं आहे, ते चुकीचं भाषांतर झालं आहे,’ ‘मराठी भाषा बोलायला शिकणे अवघड नाही फक्त ते मनापासून शिकायला पाहिजे,’ ‘तुमच्या व्यक्तिमत्त्वाला जगातील कोणत्याही भाषेचे बंधन नाही, आम्हाला तुमचा अभिमान होता आणि कायम राहिल,’ ‘अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे, लवकरच तुम्ही इतर हिंदी कलाकारांसारखे अस्खलित मराठी बोलाल आणि ज्या महाराष्ट्र भूमीने आपल्याला एवढं मोठं होण्याचं सौभाग्य दिलं, त्या महान अशा महाराष्ट्राचे ऋण फेडाल अशी आशा आहे,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.