Amitabh Bachchan Remembered Kishore Kumar : बॉलीवूडचे सदाबहार गायक म्हणजे किशोर कुमार… आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आणि लाखो लोकांना वेड लावले. आजही त्यांची अनेक गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशा या दिग्गज कलाकाराची आज (४ ऑगस्ट सोमवार) ९६ वी जयंती आहे.
किशोर कुमार यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त जगभरातील अनेक चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अनेक चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीसुद्धा किशोर कुमार यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.
किशोर कुमार यांचं कौतुक करत अमिताभ बच्चन ‘किशोर कुमार केवळ गायक नव्हते; तर ते खर्या अर्थानं एक सच्चे कलाकार होते’ असं म्हटलं होतं. ‘खाइके पान बनारसवाला’ आणि ‘रिमझिम गिरे सावन’ – या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चन यांचा उत्तम अभिनय आणि किशोर कुमार यांचा आवाज अगदी उत्तम जुळून आला होता.
याबद्दल अमिताभ असं म्हणाले होते की, “किशोर कुमार यांची प्रतिभा फक्त गाण्यापुरती मर्यादित नव्हती. किशोरदांविषयी बोलायला गेलो तर कितीतरी तास कमी पडतील.” किशोर कुमार यांना सिनेमा आणि कला याची उपजतच जाण होती. याबद्दल अमिताभ यांनी असं म्हटलं होतं की, “किशोरदा पार्श्व-गायनाकडे अगदी योगायोगाने वळले. गायन किंवा संगीताशिवाय त्यांचे दिग्दर्शकीय विचार, त्यातले कलात्मक दृष्टिकोन फारच प्रगल्भ होते, ज्याबद्दल लोकांना फारसं माहीत नव्हतं.”

यानंतर अमिताभ असं किशोर कुमार यांच्याबद्दल असं म्हणालेल की, “किशोर कुमार यांच्या आवाजामागे एक असा कलाकार होता, जो फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कलेसाठी जगत होता. त्यांच्यातली माणुसकी कायम जिवंत होती. ते कितीही व्यग्र असले किंवा त्यांच्या आयुष्यात काहीही आनंदी किंवा त्रासदायक घडत असो, ते कायम प्रेमाने आणि आपुलकीनेच वागायचे.”