Amitabh Bachchan shared a note for Abhishek Bachchan: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IIFM) २०२५ मध्ये अभिषेक बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील अभिषेक बच्चनने साकारलेल्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. अभिनेत्याला हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण जगातील सर्वांत आनंदी वडील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनचे काही फोटो शेअर करीत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्यांच्या या पोस्टची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
“तू कधीही हार…”
अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “अभिषेक, तू कुटुंबाचा अभिमान आणि सन्मान आहेस. आजोबांनी जो वारसा दिला, तो वारसा तो यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेस. सातत्य, कधीही हार न मानणे, कितीही हरलो तरी प्रयत्नांनी पुन्हा उठेन, असा तुझा स्वभाव आहे. वेळ लागला; पण तू कधीही हार मानली नाहीस. तू जगाला तुझी ताकद दाखवलीस. मेलबर्नमध्ये त्यांनी तुला सर्वोत्तम अभिनेता म्हणून घोषित केले. एका वडिलांसाठी यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही.”
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमधील आणि मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील अभिषेकचे फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले, “एक वर्षभरापूर्वी मी तुझ्या एक सुंदर परफॉर्म्सचे कौतुक केले होते. त्यावेळी सर्वांनी माझी थट्टा केली होती. मी तुझा पिता आहे म्हणून मी तुझे कौतुक करीत आहे, असे सर्वांचे म्हणणे होते. पण, आता त्या थट्टेची जागा आदर आणि कौतुकासाठीच्या टाळ्यांनी घेतली आहे.”
पुढे त्यांनी लिहिले, “जिंकणं हे उत्तर आहे. जिंकण्याची किंमत जास्त आहे. अभिषेक तू सिद्ध केलं आहेस. शांत राहा आणि तुझ्या मर्जीनुसार जग. तुझ्या कुटुंबाला तुझा अभिमान आहे. खूप प्रेम”, असा हृदयस्पर्शी संदेश लिहीत अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनचे कौतुक केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी याआधीही अभिषेक बच्चनच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांचे कौतुक केले आहे. अभिनेता काही दिवसांपूर्वीच कालीधर लापता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो लवकरच शाहरुख खानबरोबर द किंग या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.