Amitabh Bachchan And Rekha : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन व रेखा यांचं एकेकाळी अफेअर होतं. ‘दो अनजाने’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची जवळीक वाढली होती असं म्हटलं जातं. या गोष्टीला अनेक वर्षे उलटली असली तरी अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांच्यातील लव्ह ट्रँगल हा बॉलीवूडमधील चर्चेचा विषय आहे.

रेखा यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात लेखक यासिर यांनी अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. यामध्ये ‘उमराव जान’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफ्फर अली, रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल काय म्हणाले होते हा प्रसंग देखील नमूद करण्यात आला आहे.

“रेखा यांच्याबाबत वाईट झालं, अमिताभने तिच्याशी लग्न करायला हवं होतं असं मुजफ्फर अली यांना वाटत होतं” असं यासिरने लिहिलं आहे. ‘उमराव जान’ चित्रपटावेळी मुजफ्फर अली यांनी रेखाचं आयुष्य जवळून पाहिलं. त्यांच्या मते रेखाच्या व्यक्तिमत्त्वातलं चैतन्य लोप पावलं होतं. तिच्या जगण्यातलं स्वारस्यच हरपून गेलं होतं. या सगळ्यात चूक अमिताभ यांची होती.

“दिल्लीमध्ये उमराव जानच्या चित्रीकरणादरम्यान, अमिताभ अनेकदा चित्रपटाच्या सेटवर येऊन बसायचे आणि हे सत्य आहे…. रेखा जेव्हा-जेव्हा त्यांच्याशी बोलायची तेव्हा ती त्यांना ‘इनको’, ‘इन्होंने’ अशी आदराने हाक मारायची. ज्याप्रकारे पत्नी तिच्या पतीला हाक मारते अगदी तसा संवाद त्यांच्यात व्हायचा. मला असं वाटतं की, रेखा स्वत:ला विवाहित मानायची. रेखाचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि आहे… त्यांनी रेखाला आणि त्यांच्या नात्याला काहीतरी नाव, ओळख द्यायला हवी होती. अमिताभ यांनी तिच्याशी लग्न केलं पाहिजे होतं.” असं दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी लेखक यासिरला सांगितलं होतं.

याशिवाय मुजफ्फर अली यांनी ‘उमराव जान’च्या चित्रीकरणाच्या काळातील एक किस्सा देखील सांगितला. “चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रेखा म्हणत होती की, ती ६ तासांत डबिंग पूर्ण करेल, पण मला प्रत्येक संवाद आणि शब्द परफेक्ट हवे होते, त्यात विशिष्ट भाव अपेक्षित होता. रेखा तेव्हा घाबरली होती आणि डबिंग करण्यासाठी १ आठवडा लागला होता.” असंही दिग्दर्शकाने सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेखा यांना ‘उमराव जान’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर, अमिताभ बच्चन व रेखा यांनी शेवटचं एकत्र ‘सिलसिला’ या सिनेमात काम केलं होतं. यानंतर पुढे कधीही त्यांनी एकत्र काम केलं नाही.