Amitabh bachchan Talks About Health Issues : चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान बऱ्याचदा कलाकारांना सीन करताना विशेषकरून स्टंट करताना दुखापत होते. असंच काहीसं बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही झालेलं. ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर त्यांचा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठी अडचण निर्माण झाली.

अमिताभ यांनी स्वत: याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागात त्यांच्या चाहत्यांना याबद्दल सांगितलेलं. १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन करताना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या यकृताला मोठी दुखापत झाली. ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागातील त्यांचा हा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जिथे ते त्यांच्या आजाराबद्दल सांगताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांची गंभीर आजाराबद्दल प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन या व्हिडीओमध्ये असं म्हणताना दिसतात, “१९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातादरम्यान मला खूप जास्त रक्ताची गरज होती. त्यावेळी जवळपास २०० लोकांनी रक्तदान केलेलं आणि ६० बाटल्या रक्त जमा झालं होतं. त्यावेळी रक्तदान करणाऱ्यांमधील एक व्यक्ती Hepatitis B या व्हायरसने ग्रस्त होता, जो व्हायरस त्यावेळी डिटेक्ट झाला नाही; पण त्या रक्तामधून तो माझ्या शरीरात गेला.”

बिग बी पुढे याबद्दल म्हणाले, “२००५ दरम्यान एका चाचणीदरम्यान कळलं की, माझ्या यकृतामधील ७५ टक्के भाग खराब झाला आहे. आता मी यकृतामधील फक्त २५ टक्के भागावर जगत आहे. सांगायचा मुद्दा हा की, जर त्या त्यावेळी आपण तपास केला नाही, तर असे आजार पुढे खूप मोठे होतात.”

अमिताभ यांनी पूर्वी ‘पीटीआय’ला त्यांना झालेल्या अजून एका गंभीर आजाराबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले, “२००० साली मला टीबीचं निदान झालेलं. त्यामुळे माझ्यावर अनेक उपचार सुरू होते. ज्या दिवशी मी ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाला सुरुवात करणार होतो, त्याच दिवशी मला टीबीचं निदान झालं. हा पाठीच्या मणक्याचा टीबी होता, ज्यामुळे खूप त्रास व्हायचा. उठता-बसताही यायचं नाही. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत असताना मी दररोज ८-१० गोळ्या खायचो, ज्यामुळे मला सूत्रसंचालन करताना तग धरणं शक्य व्हायचं”.

अमिताभ यांनी याबद्दल पुढे सांगितलं, “बरेच लोक मला सांगतात की, वैद्यकीय गोष्टींमध्ये मी पैसे दान का करतो याचं कारण हेच आहे की मी स्वत: टीबीनं ग्रस्त आहे. त्यामुळे असे आजार सहन करणं म्हणजे तुमचा विमान अपघात झाला आहे किंवा तुम्ही ज्या नावेत बसलात ती पाण्यात बुडाली आणि त्यातून तुम्ही वाचलात, असे अनुभव येतात. जी माणसं असे आजार सहन करतात, ते खरंच खूप खंबीर असतात.”