Amitabh Bachchan Talk’s About How Aging Has Changed Simple Things : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही आजही ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आजही ते त्यांच्या अभिनयाद्वारे अनेकांची पसंती मिळवीत आहेत. पण वाढत्या वयामुळे त्यांना दैनंदिन जीवनात काही समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांनी सल्ला दिल्यानुसार ते सर्व गोष्टी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाढत्या वयामुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल, तसेच दैनिक वेळापत्रकाबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय, “आता दिवसासाठी आखलेली नियमित दिनचर्या औषधं घेणं आणि गरजेच्या गोष्टी पूर्ण करणं यामध्ये अडकली आहे. प्राणायाम, योगासनं नीट केली पाहिजेत. चालता येण्यासाठी आणि शरीराचं संतुलन टिकवण्यासाठी जिममध्ये हलकीफुलकी हालचाल, मोबिलिटी एक्सरसाइजेस कराव्या लागतात. शरीराचं संतुलन हळूहळू ढासळायला लागतं आणि त्यावर लक्ष ठेवून, ते सुधारण्यासाठी काम करावं लागतं.”
“पूर्वी ज्या काही दिनचर्या होत्या, त्या पुन्हा सुरू करणं सहज होईल, असं वाटतं. कारण- त्या काही वर्षांपूर्वी केल्या होत्या; पण तसं अजिबात नाही. फक्त एक दिवसच जर सोडला, तर पुन्हा वेदना सुरू होतात आणि शरीराची हालचाल म्हणजे एक दीर्घ चाल होऊन जाते. याचं आश्चर्य वाटतं की, जे पूर्वी सहज शक्य होतं, त्या साध्या हालचाली आता करण्याआधी मनाला विचार करावा लागतो.”
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “आता पँट घालणंदेखील तितकंसं सोपं राहिलेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, बसून पँट घाला. उभं राहून घालू नका, नाही तर तोल जाऊ शकतो आणि तुम्ही पडू शकता. ते ऐकून मी मनातल्या मनात हसलो. पण मग लक्षात येतं की, ते किती बरोबर होते.
ही छोटीशी क्रिया, जी पूर्वी अगदी सहज होत होती; पण आता ती एका विशिष्ट पद्धतीनंच करावी लागते. शरीराला सावरायला आणि स्थिर ठेवायला आता प्रत्येक हालचालीसाठी अशा आधारांची गरज भासते. अगदी साधं उदाहरण द्यायचं, तर टेबलावरून वाऱ्यानं उडून गेलेली एक कागदाची चिठ्ठी उचलण्यासाठीही आता शरीर झुकवताना आधार लागतो.”
“ज्या गोष्टी आधी खूप पटकन व्हायच्या, त्यांना आता खूप वेळ लागतो. यामुले वाचणारे कदाचित हसू शकतात. पण, माझी एकच इच्छा आहे की, ही अवस्था तुमच्यापैकी कुणालाही कधीच अनुभवायला लागू नये. पण खरं सांगायचं, तर ही वेळ प्रत्येकावर येतेच. माझी इच्छा आहे की, तसं होऊ नये; पण ती वेळ येईलच. आपण या जगात जन्म घेतो, त्या दिवसापासूनच हळूहळू उताराची वाट चालायला लागतो हे दुःखद आहे; पण हेच जीवनाचं कटू सत्य आहे.”
“तरुणपणात आपण आयुष्यातल्या सगळ्या आव्हानांना आत्मविश्वासानं सामोरं जातो; पण वय वाढलं की, जणू काही आयुष्याला स्पीडब्रेकर लागतो आणि थांबलो नाही तर पुढचा धक्का फार जोरात बसेल. कोणीच म्हातारपणात द्यावी लागणारी झुंज जिंकू शकत नाही आणि शेवटी आपण सगळे हरतो. ही एक अशी हार आहे, जिचा स्वीकार करणंच योग्यच ठरतं. तुमचं अस्तित्व, तुमचं काम पूर्ण झालंय. थोडं बाजूला व्हा आणि तयार व्हा. हे सगळं थोडंसं गंभीर वाटतंय. जणू काही मृत्यूचा विचार चालू आहे; पण याला कारण आहे. -श्वेतानं मला ऐकवलेली काही मनाला भिडणारी वाक्यं.”