Amitabh Bachchan’s Entry In Ranbir Kapoor’s Ramayana : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. अशातच आता या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

रणबीर कपूर या चित्रपटात रामाची भूमिका साकारणार आहे; तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासह अभिनेता सनी देओल, यश, रवी दुबे, आदिनाथ कोठारे यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. आता ‘रामायण’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या नावाची कोणत्या भूमिकेसाठी चर्चा होते आहे ते जाणून घेऊया…

अमिताभ बच्चन करणार ‘रामायण’ चित्रपटाचं निवेदन?

‘मिड डे’च्या वृत्तानुसार ‘रामायण’ चित्रपटाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या आवाजानं होणार आहे. म्हणजेच अमिताभ बच्चन चित्रपटात जटायूच्या पात्राला आवाज देणार असून, ते या चित्रपटाचं निवेदन (Narration) करणार आहेत. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या अहवालानुसार याबाबत अमिताभ बच्चन व चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू आहे. परंतु, या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यानं केली आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी स्टारकास्ट असून, अनेक लोकप्रिय कलाकार मंडळी या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय यामध्ये मुख्य भूमिकेत असलेले रणबीर कपूर व साई पल्लवी हे दोघे पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करीत आहेत.

सनी देओलने केलं रणबीर कपूरचं कौतुक

अभिनेता सनी देओलनंही नुकतीच ‘रामायण’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तो हनुमानाच्या भूमिकेतून झळकणार आहे. ‘झूम’शी संवाद साधताना यावेळी त्यानं रणबीर कपूरच कौतुक केलं आहे. रणबीर कपूरबद्दल म्हणाला, “त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा येणार आहे. तो खूप चांगला अभिनेता आहे. तो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मनापासून काम करतो.”

‘रामायण’ चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार आहे आणि दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.