Shankar Mahadevan Recalls Working With Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. प्रेक्षकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच त्यांचे चाहते आहेत. त्यांच्याबद्दल अनेकांना आदरयुक्त भीती असते. अशातच लोकप्रिय दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
शंकर महादेवन यांनी ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. शंकर महादेवन यांनी ‘कजरा रे’ या लोकप्रिय गाण्यासंदर्भातील किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, “जेव्हा मी ‘कजरा रे’ हे गाणं गायलं तेव्हा मी गाण्यातील अमिताभ यांचा भागही रेकॉर्ड केला होता. जेणेकरून ते नंतर गाण्यातील तेवढा भाग डब करतील. ते खूप चांगले गायक व कंपोजर आहेत.”
शंकर महादेवन यांनी सांगितला ‘कजरा रे’ गाण्यादरम्यानचा ‘तो’ किस्सा
शंकर महादेवन याबद्दल सांगताना पुढे म्हणाले, “त्यामुळे त्यांना जेव्हा विचारलं की, तुम्ही डबिंगसाठी स्टुडिओमध्ये कधी येताय? त्यावर ते म्हणाले, कोणतं डबिंग काय बोलतोयस? मी सांगितलं की, ‘कजरा रे’मधील तुमचा भाग रेकॉर्ड करण्यासाठी. त्यावर ते म्हणाले, मी का करू डब. मी त्यांना समजावलं की, गाण्यातील हा भाग तुमचा आहे, जो तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. मी फक्त तात्पुरतं रेकॉर्डिंग केलंय त्याचं. त्यावर ते गंमत करीत म्हणाले की, मी डब करणार नाही. तू छान गायलं आहेस आणि जर तू दुसऱ्या कोणाला डब करायला सांगितलं, तर मी तुझं करिअर उद्ध्वस्त करीन”.
अमिताब बच्चन यांचा तो किस्सा सांगत शंकर महादेवन पुढे म्हणाले, “तेव्हा मला जाणवलं की, माझा आवाज अमिताभ यांच्यासारखा अजिबात नाहीये. ‘झुम बराबर झुम’ गाण्याच्या वेळीसुद्धा असंच काहीसं झालेलं. तो चित्रपट फार चालला नाही; पण त्यातील गाणी मात्र प्रचंड हिट झाली. लोक आजही त्यातील गाणी गायल्याशिवाय आम्हाला सोडत नाहीत. त्या चित्रपटातील शीर्षक गीतासाठीसुद्धा अमिताभ बच्चन यांनीच मला सांगितलं होतं.
दरम्यान, २००५ साली ‘बंटी और बबली’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला. त्यामधील ‘कजरा रे’ हे गाणं त्याकाळी खूप गाजलेलं. त्या काळी या गाण्याची प्रचंड क्रेझ होती. अनेक लग्नांमध्ये, क्लबमध्ये हे गाणं वाजवलं जायचं. त्या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे तिघेही होते.