बॉलीवूडचे ‘शेहनशाह’ म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ हे त्यांच्या कामाशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येत असतात. आपल्या भूमिका आणि कामाच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध असणारे अमिताभ बच्चन रोजच्या जगण्याच्या सवयींसाठीसुद्धा तितकेच ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच रस असतो.

अमिताभ बच्चन आता ना धूम्रपान करत; ना दारू पित. मात्र, एक काळ असा होता जेव्हा ते एका दिवसाला २०० सिगारेट ओढायचे. हो! हे खरं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत:च याबाबत एका जुन्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. १९८० मध्ये ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पूर्वीच्या सवयींबद्दल सांगितलं होतं. ज्यामध्ये अति धूम्रपान, रोजचं मद्यपान आणि मांसाहार खाण्याच्या सवयींचा समावेश होता.

याबद्दल अमिताभ म्हणाले होते, “मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही आणि मांसाहारही करत नाही. हे कोणत्याही धर्मिक कारणामुळे नाही, तर हा चवीचा विषय आहे. माझ्या कुटुंबात माझे वडील शाकाहारी होते. पण माझी आई शाकाहारी नव्हती. तसंच जया मांसाहारी जेवण खातात आणि मी खात नाही. पूर्वी मी खायचो. मद्यपान आणि धुम्रपानसुद्धा करायचो. पण आता मी सर्वकाही सोडून दिलं आहे.”

यानंतर त्यांनी कोलकातामधील शूटिंगचा किस्सा सांगताना म्हटलं होतं, “कोलकातामध्ये मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, होय २००… पण मुंबईत आल्यानंतर मी ते सर्वकाही सोडलं. मी मद्यपान करायचो. काही वर्षांपूर्वी मी ठरवलं की, मला या सर्व गोष्टींची आता काही गरज नाही. या सवयींमुळे मला कोणतीही अडचण येत नाही. फक्त परदेशात शूटिंग करत असताना अडचण असते, कारण तिथे शाकाहारी जेवणाची समस्या आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमिताभ बच्चन हे त्यांच्या अनेक चित्रपटांमधील विविध भुमिकांसाठी ओळखले जातात. सर्वच पिढीतील लोक त्यांचा चाहतावर्ग आहे. अभिनयासह ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांशी संवादही साधत असतात. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते नुकतेच ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दिसले होते आणि त्यानंतर रजनीकांतच्या ‘वेत्तैयान’मध्येही दिसले.