September 10 The Date That Shaped Amitabh Bachchan’s Legacy : अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतलं मोठं नाव. ते गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बिग बींनी फक्त भारतातच नाही तर त्यांच्या डॅशिंग अंदाजाने जगभरात प्रसिद्धी मिळवली.

अमिताभ बच्चन यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच त्यांना ‘अ‍ॅक्टर ऑफ द सेंच्युरी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. ज्यामुळे सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटलेला. १० सप्टेंबर २००१ साली अमिताभ बच्चन यांना ‘अ‍ॅक्टर ऑफ द सेंच्युरी’ या पुरस्काराने इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सन्मानित करण्यात आलेलं.

अमिताभ बच्चन यांना मिळालेला हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसून तो भारतीय सिनेमासाठीसुद्धा मोठा अभिमानाचा क्षण होता. अमिताभ बच्चन यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली ते १९६९ मध्ये. त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु, त्यांच्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता पण त्यांच्या अभिनयाने अनेक समीक्षकांचं तसंच प्रेक्षकांचंही लक्ष वेधलं.

अमिताभ बच्चन यांनी ‘आनंद’ चित्रपटात डॉ. भास्कर ही भूमिका साकारलेली ज्यासाठी त्यांचं अनेकांकडून कौतुक झालं आणि त्यांना ‘फिल्मफेअर’चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळालेला. परंतु, असं म्हटलं जातं की त्यांना खरा ब्रेक मिळाला ते १९७३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटामुळे. यामुळे इंडस्ट्रीत त्यांची ओळख निर्माण झाली. यातील त्यांच्या इन्स्टपेक्टर विजय खन्ना यातील भूमिकेने त्यांना बॉलीवूडमध्ये अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून दिली.

अमिताभ बच्चन यांनी यासह ‘दिवार’, ‘शौले’, ‘डॉन’, ‘त्रीशुल’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटात काम केलं. १९७०-१९८० हा काळ अमिताभ बच्चन यांनी गाजवला. त्यावेळी प्रदर्शित झालेले त्यांचे सर्व चित्रपट हिट ठरले. परंतु त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. १९८२मध्ये ‘कुली’ चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना त्यांना दुखापत झाली. त्या अपघातानंतर देशभरातील त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते.

सिनेमा व्यतिरिक्त त्यांनी टेलीव्हिजनवरही त्यांची छाप सोडली. २००० सालादरम्यान, त्यांनी टेलीव्हिजनवर पदार्पण केलं आणि ‘कौण बनेगा करोडपती’ या कार्यक्राची होस्ट म्हणून धुरा सांभाळली.

अमिताभ बच्चन यांना ‘अ‍ॅक्टर ऑफ द सेंच्युरी’ हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित दिग्गंजानी उभं राहून त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिलेली. या व्यतिरिक्त त्यांना, ‘पद्मश्री’, ‘पद्म विभूषण’, ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारही मिळाला आहे.