Amruta Singh & Saif Ali Khan Wedding : अमृता सिंह व सैफ अली खान हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. करीना कपूरबरोबर लग्न करण्यापूर्वी सैफ अली खाननं अमृता सिंहबरोबर लग्न केलं होतं. दोघांचा प्रेमविवाह होता आणि सैफबरोबरच्या लग्नासाठी अमृतानं तिचं नावही बदललं होतं. परंतु, या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि दोघांनी पुढे घटस्फोट घेतला.

अमृता व सैफनं १९९१ मध्ये लग्न केलेलं. त्यांच्या लग्नाची स्टोरी खूप रंजक आहे. एकमेकांबरोबर लग्न करण्यापूर्वी ते काही दिवस एकत्र राहत होते. अमृता सैफपेक्षा वयानं १२ वर्षांनी मोठी होती आणि त्यांनी घरच्यांपासून लपवून लग्न केलेलं. डिझायनर अबू जानी व संदीप खोसला यांनी एका मुलाखतीत सैफ व अमृताच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

नम्रता झकारियाशी संवाद साधतना ते सैफ व अमृताच्या लग्नाबद्दल म्हणाले, “एक दिवस अचानक ते आमच्याकडे आले आणि म्हणाले की, आम्हाला आता लग्न करायचं आहे. ते दोघेही प्रेमात होते आणि सैफ अमृताबरोबर राहत होता. जवळपास ६-८ महिने ते दोघे एकत्र राहिले असतील. सैफ अमृताशी लग्न करण्यासाठी तयार होता; पण अमृता हो-नाही, असं म्हणत होती. आम्ही त्यावेळी एका रूममध्ये राहिलो. तेव्हा आम्ही सैफला लग्नासाठी तयार केलं. मौलवी आणि सरदारजी पंडितला बोलावलेलं.”

सैफ अली खानबरोबर लग्न करण्यासाठी अमृता सिंहने बदललेलं नाव

संदीप खोसला व अबू जानी पुढे म्हणाले, “त्यावेळी मौलवी आणि सरदारजी पंडित यांना बोलावलेलं. अमृता तिला जमलं तशी ती तयार झालेली. कारण- त्यावेळी घाईघाईत फार काही नव्हतं. सुदैवानं तिच्याकडे तिच्या आईचे सुंदर दागिने होते. दोघेही तयार झाले आणि तेव्हा मौलवींनी विचारलं की, तुझं नाव काय आहे. तुझं नाव अ अक्षरावरून सुरू व्हायला हवं. आम्ही सगळे एकमेकांकडे बघायला लागलो आणि तेव्हा तिथे असलेले पंडित म्हणाले, अझिझा. ते सगळं खूप घाईघाईत झालेलं; पण शेवटी सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला.”

‘झूम’शी संवाद साधतना अमृतानं सांगितलेलं, “लग्नानंतर मी खूप आळशी झाले होते. संसारात स्वत:ला वाहून घेतलेलं. मी तेव्हा माझ्या त्या जगात हरवून गेले होते.” सैफनं सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलेलं, “मला तिच्या घरी जेवणाचं आमंत्रण देण्यात आलेलं. त्यानंतर मी दोन दिवस तिच्याच घरी दुसऱ्या खोलीत राहत होतो.” अमृता त्यावर पुढे म्हणालेली, “तो दोन दिवस माझ्या घरी राहिला; पण त्यानंतर शूटसाठी त्याला जावं लागलं. त्यावेळी त्यानं माझ्याकडे १०० रुपये मागितले होते. मी त्याला माझ्या गाडीनं जा, असं सांगितलेलं; पण तो म्हणालेला की, प्रॉडक्शनची गाडी आली आहे.”

सैफनं त्यांच्या रिलेशनशिपबद्दल त्याची आई शर्मिला टागोर यांना माहीत होतं. त्याबद्दल सांगितलेलं. तो म्हणालेला, “माझ्या आईला आमच्या रिलेशनशिपबद्दल माहीत होतं. माझी आई म्हणालेली, मी आशा करते की, तू तझ्या रिलेशनशिपमध्ये आनंदी असशील. पण तू लग्न करू नकोस आणि मला आश्चर्य वाटलं की, मी त्यावेळी २१ वर्षांचा असतानाही ती मला असं का म्हणाली.”