Mohit Suri recalls casting Amrita Singh in Kalyug: अमृता सिंह यांनी ‘बेताब’, ‘मर्द’, ‘नाम’, ‘आईना’, ‘टू स्टेट्स’, ‘कलयुग’, ‘सनी’, ‘सूर्यवंशी’ अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
अमृता सिंह यांची कलयुग या सिनेमातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटातील त्यांची भूमिका अमृता सिंह यांनी अजरामर केली. जेव्हा या चित्रपटातील भूमिकेसाठी अमृता सिंह यांना विचारणा केली होती. त्यावेळी त्या व सैफ अली खान यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती.
“आम्ही गाडी वळवली आणि परत…”
आता मोहित सुरीने एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे. मोहित सुरीने नुकतीच ‘रेडिओ नशा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोहित सुरी म्हणाला, “मला आठवतंय की, मी आणि कुणाल अमृता सिंग यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्या ‘काव्यांजली’ चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. मी त्यांना चित्रपटाचे कथानक सांगितले. तुम्ही पुरुषप्रधान इंडस्ट्रीवर प्रभुत्व गाजवणारी, अतिशय सशक्त स्त्री व्यक्तिरेखा साकारावी, अशी माझी इच्छा आहे, असे मी त्यांना सांगितले. मी ज्यावेळी त्यांना कथानक सांगत होतो, त्यावेळी त्या काहीतरी विचार करत होत्या, असे जाणवले. कथानक संपल्यानंतर त्यांनी ही भूमिका साकारण्यासाठी होकार दिला. त्यानंतर मी आणि कुणाल निघालो.”
“वाटेत मला जाणीव झाली की, मला जे पात्र माझ्या चित्रपटात हवे आहे अमृता सिंह तशाच आहेत. आम्ही गाडी वळवली आणि परत त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो की, तुम्ही जशा आहात, तशीच भूमिका चित्रपटात साकारायची आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, मीसुद्धा हाच विचार करत होते. माझ्यावर कोणीही वर्चस्व गाजवू शकत नाही. मी आधीच वर्चस्व गाजवत आहे. त्यावर अशीच व्यक्तिरेखा चित्रपटात साकारायची असल्याचे मी त्यांना सांगितले.”
अमृता सिंह यांच्या कास्टिंगबद्दल बोलताना मोहित म्हणाला की महेश भट्टसाहेबांनी त्यांचे नाव सुचवले. कारण- त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर काम केले होते. त्यामुळे या भूमिकेसाठी अमृता सिंह योग्य असतील, असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्यांचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर होता. एक नवीन सुरुवात त्या करीत होत्या. विश्वास बसणार नाही; पण इतकं स्टारडम पाहिल्यांतरही त्या कामाप्रति समर्पित होत्या.”
जेव्हा सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी लग्नगाठ बांधली होती, त्यावेळी त्यांची मोठी चर्चा झाली होती. २००४ मध्ये जेव्हा त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीदेखील त्यांची मोठी चर्चा झाली. ते का वेगळे होत आहेत, याबद्दल अमृता सिंग यांनी फारसे वक्तव्य केले नाही. मात्र, सैफ अली खानने अनेक मुलाखतींमध्ये त्याची बाजू मांडली होती.
‘टेलिग्राफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणालेला की, त्यांच्यात सतत मतभेद होत होते. तो म्हणालेला की, सतत अपमान करणे, माझ्या आई-बहिणीला शिवीगाळ करणे, हे चांगले नाही. मी या सगळ्यातून गेलो आहे. याच मुलाखतीत तो असेही म्हणालेला की, मी अमृताला पाच कोटी पोटगी म्हणून देणार आहे. त्यातील जवळजवळ अडीच कोटी मी आधीच दिले आहेत. माझा मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत मी त्याच्यासाठी महिन्याला एक लाख रुपये देणार आहे. मी शाहरुख नाही. माझ्याकडे तितके पैसे नाहीत. मी तिला उरलेले सगळे पैसे देईन, असे मी तिला सांगितले आहे.