रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

रणबीरच्या बरोबरीनेच चित्रपटातील या सहकलाकारांची कामं लोकांना पसंत पडली आहेत. खासकरून या चित्रपटात केवळ १५ ते २० मिनीटांसाठी दिसणाऱ्या बॉबी देओलने बाजी मारली आहे. चित्रपटात बॉबीने अब्रार हक या खलनायकाची भूमिका निभावली आहे. अगदी काही मोजक्या सीन्समध्येच बॉबीने त्याच्या अभिनयातून सिद्ध केलं आहे की टु एक उत्कृष्ट नट आहे. ‘अ‍ॅनिमल’ पाहून झाल्यावर तर कित्येकांनी बॉबीला चित्रपटात आणखी वेळ द्यायला हवा होता अशी खंतही व्यक्त केली. आता मात्र बॉबीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

आणखी वाचा : “जेव्हा फरहान ‘मिर्झापूर’सारखी…”, ‘अ‍ॅनिमल’वर टीका करणाऱ्या जावेद अख्तर यांना संदीप रेड्डी वांगा यांचं चोख उत्तर

‘अ‍ॅनिमल’चे मार्केटिंग डायरेक्टर वरुण गुप्ता यांनी ‘झुम’शी संवाद साधताना अब्रार हकच्या स्पिन ऑफ चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. खास बॉबीसाठी त्याचं कथानक सादर करणारा एक स्वतंत्र चित्रपट येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. वरुण म्हणाले, “संदीप सरांना अजून याबद्दल विचार करायला व लिखाणाला वेळ मिळालेला नाही, परंतु बॉबीच्या पात्राच्या स्पिन-ऑफबद्दल चर्चा सुरू आहे, सगळेच यावर आपापली मतं देत आहेत, परंतु अजून यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “सध्या सगळेच फक्त आणि फक्त ‘अ‍ॅनिमल पार्क’वर काम करत आहेत व त्यासाठी उत्सुक आहेत, बाकी इतर गोष्टी विचाराधीन आहेत.” याबरोबरच चित्रपटाच्या प्रमोशन व मार्केटिंगमध्ये संदीप रेड्डी वांगा यांचा पूर्ण सहभाग होता अन् त्यामुळेच या चित्रपटाला एवढं यश मिळालं असल्याचा खुलासाही वरुण गुप्ता यांनी केला आहे. पण बॉबीच्या पात्रावर वेगळा चित्रपट येणार या विचारानेच त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.