ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी नुकताच खुलासा केली की त्यांनी एका दुखापतीतून बरं व्हायला लघवी प्यायली होती. त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे खूपच चर्चा होत आहे. याचदरम्यान एका बॉलीवूड अभिनेत्रीनेही स्वतःची लघवी प्यायचा दावा केला. इतकंच नाही तर तिने लघवी पिण्याचे फायदेही सांगितले.

लघवीबद्दल हा दावा करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आशिकी गर्ल अनु अग्रवाल आहे. अनुने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं की तिनेही तिची लघवी प्यायली आहे.

अनु अग्रवालने इन्स्टंट बॉलीवूडशी बोलताना हा दावा केला. परेश रावल यांनी दुखापतीतून बरं व्हायला लघवी प्यायली, याबद्दल प्रतिक्रिया विचारल्यावर अनु म्हणाली, “बऱ्याच लोकांना हे माहीत नाही. जागरुकता नसल्याने लोकांना याबद्दल माहीत नाही. लघवी पिणे याला आम्रोली म्हणतात.”

अनुने सांगितले लघवी पिण्याचे फायदे

अनु पुढे म्हणाली, “मी स्वतः लघवी प्यायली आहे. आतापर्यंत अनेकांनी हा प्रयोग करून पाहिला आहे. लघवी पिणे ही चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सगळी लघवी पिऊ शकत नाही. तुम्हाला फक्त एक भाग प्यावा लागेल. मधला भाग अमृत मानला जातो. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही. तसेच हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी स्वतः ते अनुभवलं आहे,” असा दावा अनुने केला.

परेश रावल काय म्हणाले होते?

‘घातक’ चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन करताना परेश रावल जखमी झाले होते. ते नानावटी रुग्णालयात असताना तिथे अजय देवगणचे वडील वीरू देवगण आले होते. “ते आले आणि मला विचारलं की काय झालंय? मी त्यांना माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल सांगितलं. त्यांनी मला सकाळी उठून लघवी प्यायला सांगितलं. सर्व फायटर्स असं करतात. असं केल्याने तुम्हाला कधीही कोणतीही समस्या होणार नाही, फक्त सकाळी उठून लघवी प्या. त्यांनी मला दारू, मटण किंवा तंबाखूचे सेवन करू नका, असं सांगितलं. नियमित सकस आहार घ्या आणि सकाळी लघवी प्या,” असा सल्ला दिला.

“मी लघवी बिअरसारखी घोट-घोट पिणार, कारण जर मला लघवी प्यायचीच असेल तर ती मी योग्य पद्धतीने पिणार. मी १५ दिवस प्यायलो आणि जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांना एक्स-रेमध्ये एक पांढरी लायनिंग दिसली, ज्यावरून दुखापत बरी झाल्याचं स्पष्ट झालं,” असं परेश रावल म्हणाले.