अनुपम खेर बॉलिवूडमधल्या अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदी, इंग्रजीसह अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्यावर ते सतत काही ना काही पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनेकदा त्यांच्या आई, दुलारी खेर दिसतात. अनुपम यांनी खास त्यांच्यासाठी काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यांच्या ‘मंजिले और भी है” या नव्या टॉकशोची नुकतीच सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये दुलारी खेर यांनी हजेरी लावली होती. यावेळी अनुमप खेर यांनी त्यांची आई दुलारी यांना काश्मीरमध्ये घर घेऊन देण्याचे वचन दिले.

आणखी वाचा : Video: कतरिना कैफची टी-२० वर्ल्ड कपमध्ये एंट्री, हरभजन सिंगने टाकलेल्या चेंडूंवर मारले षटकार

अनुपम खेर काही महिन्यांपूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली गेली. अनुपम खेर आणि त्यांचे कुटुंबही काश्मिरी आहे. अनुपम खेर यांची आई दुलारी सध्या शिमला येथे राहतात. अनुपम खेर यांनी नुकतीच त्यांची आई दुलारी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत दुलारी यांनी त्यांना काश्मीरमध्ये स्वतःचे घर हवे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. अनुपम खेर यांनीही आपल्या आईची ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि ते दुलारी यांना काश्मीरमध्ये घर भेट देणार असे सांगितल्यावर दुलारी यांना अश्रू अनावर झाले.

या मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी आई दुलारी यांना विचारले की, “तू मला शिमला येथे घरी नेण्यास का सांगितलेस?” त्यावर उत्तर देताना दुलारी म्हणाल्या की, “माझ्या काही मौत्रिणी तिथे राहतात आणि माझे पती पुष्करनाथ खेर यांनाही ती जागा आवडायची.” पण पुढे दुलारी म्हणाल्या, “जर शिमला हा काश्मीरचा भाग असता तर मला तिथे कधीही घर मिळाले नसते.” त्यावर अनुपम खेर म्हणाले, “काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकल्यापासून तुझ्याकडे काश्मीरचे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. म्हणजेच आता तू तिथली रहिवासी आहेस आणि तू काश्मीरमध्ये घर घेऊ शकतेस.”

अनुपम खेर यांच्या या बोलण्यावर दुलारी यांनी अनुपम यांना विचारले, “हे खरोखर शक्य आहे का?” त्यावर अनुपम खेर यांनी होकार दिला. नंतर दुलारी म्हणाल्या, “मग तू तिथे घर घे. बंगला घे. मग आपण शिमलाचे घर भाड्याने देऊ किंवा विकू. मला करण नगरमध्ये तितलीसमोर घर बांधायचे आहे.” त्यानंतर अनुपम खेर यांनी आईला सांगितले की, “काश्मीरमध्ये घर घेण्यासाठी आपल्याला शिमलाचे घर विकायची गरज नाही. आपण आपले हे घर न विकताही काश्मीरमध्ये घर घेऊ शकतो.” असे म्हणत अनुपम खेर यांनी दुलारी यांना काश्मीरमधील आवडणाऱ्या ठिकाणी घर घेऊन देण्याचे वचन दिले. अनुपम यांच्या या बोलण्याने दुलारी भावूक झाल्या आणि त्यांनी अनुपम यांना मिठी मारली.

हेही वाचा : अनुपम खेर यांनी ‘या’ कारणामुळे घेतली अनुराग ठाकुरांची भेट; फोटो शेअर करत म्हणाले…

दरम्यान, अनुपम खेर यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह अमिताभ बच्चन, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डॅन्झोपा हे कलाकार दिसणार आहेत. राजश्री फिल्म्सच्या सूरज बरजातिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चार जिवलग मित्रांची कथा सांगणारा हा चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे.