Anupam Kher on ageism: अनुपम खेर हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी काम केलेले अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. त्यांनी यावर्षी २२ वर्षांनंतर तन्वी द ग्रेट या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनरागमन केले. या चित्रपटात जॅकी श्रॉफ , बोमन इराणी आणि पल्लवी जोशी हे प्रमुख भूमिकांत दिसले.
“आमचे आयुष्यदेखील…”
आता अनुपम खेर यांचे एक वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ कलाकारांना हलक्या फुलक्या भूमिका मिळत आहेत, तसेच अनेक दिग्गज कलाकार सध्याच्या नवीन पिढीतील कलाकारांपेक्षा जास्त चित्रपटात काम करत असल्याचे त्यांनी म्हटले.
अनुपम खेर म्हणाले, “कलाकार असण्याबरोबरच आम्ही आमचे आयुष्यदेखील भरभरून जगतो. ज्या गोष्टी करतो, त्या मनापासून करतो. आम्ही आयुष्य जगतो आणि तेच महत्त्वाचे आहे. आम्ही प्लास्टिकचे बनलेलो नाही. आम्हाला त्रास होतो, तर होतो. जर आमची मानसिक स्थिती चांगली नसेल तर तसं आम्ही एकमेकांना सांगतो.”
एक किस्सा सांगत अनुपम खेर म्हणाले, “एक मोठा निर्माता होता. मला कास्टिंग करण्याबाबत तो दुसऱ्या एका व्यक्तीशी बोलत होता. तो त्याला सांगत होता की याला चित्रपटात घ्यायला नको, याला चित्रपटात भूमिका दिली तर चित्रपट जुना वाटतो. त्या निर्मात्याच्या एका जवळच्या व्यक्तीने मला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा मला धक्का बसला होता. पण, हीरा हा हीरा असतो; तो कितीही जुना झाला तरी त्याची किंमत कमी होत नाही.”
अनुपम खेर यांनी इतक्या वर्षांनंतर ‘तन्वी द ग्रेट’मध्ये दिग्दर्शक म्हणून काम करण्याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, “चार दशकांहून अधिक काळ अभिनेता म्हणून काम केल्यानंतर आता जेव्हा तन्वी द ग्रेटमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले, तेव्हा कलाकारांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडला गेलो. मी एक अभिनेता-दिग्दर्शक आहे, म्हणून मला माहीत आहे की कलकारांच्या मनात कोणत्या गोष्टींबाबत असुरक्षितता असते.”
दरम्यान, तन्वी द ग्रेट चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच अनुपम खेर प्रमुख भूमिकेतदेखील दिसले होते. हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता.