Anupam Kher Talk’s About Rohini Hattangadi : रोहिणी हट्टंगडी ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या कामामुळे त्यांनी अनेकांची पसंती मिळवली. परंतु, असं असलं तरी बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मात्र रोहिणी यांच्याबद्दल एकदा तक्रार केलेली. याबाबत लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सांगितलं आहे.
रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी लोकप्रिय मराठी अभिनेत्री व लेखिका मुग्धा गोडबोले यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, मुग्धा यांनी रोहिणी हट्टंगडी व अनुपम खेर यांचा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “मी एकदा रोहिणी ताईंबद्दल काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता आणि तो बऱ्यापैकी विस्तृत होता. त्यावेळेला मी अनुपम खेर यांना फोन केला होता.”
मुग्धा पुढे म्हणाल्या, “मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या मॅनेजरने फोन उचलला होता. मी त्यांना विचारलं की, मला अनुपम खेर यांच्याबरोबर रोहिणी ताईंसंदर्भात बोलायचं आहे. मी कधी करू फोन? त्यावर ते कॅलेंडर बघून मी सांगतो तुम्ही एक काम करा उद्या २ वाजता फोन करा, असं म्हणालेले. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला सांगाल त्या वेळेला फोन करेन, अगदी मध्यरात्रीपण करेन. अनुपम खेर यांच्याशी मला बोलता येणार आहे वगैरे तर, असं म्हणून मी फोन ठेवला.”
अनुपम खेर यांनी रोहिणी हट्टंगडी यांची केलेली तक्रार
अनुपम खेर यांचा किस्सा सांगत मुग्धा पुढे म्हणाल्या, “मी तो फोन ठेवल्यानंतर काही वेळातच मला अनुपम खेर यांचा फोन आला आणि त्यानंतर ते पाऊण तास माझ्याशी रोहिणी ताई तुझ्याबद्दल बोलत होते. ते भरभरून बोलत होते. ‘सारांश’ चित्रपटाबद्दलही ते बोलले. पण, त्यावेळेला रोहिणी ताई त्यांनी तक्रार केली किंवा ते खूप मनापासून म्हणाले होते की, ती फार उत्तम अभिनेत्री आहे आणि मला असं वाटतं की, तिने जेवढं करायला हवं होतं तेवढं केलं नाही. ती मालिकांमध्ये अडकली, असं काहीतरी ते म्हणाले होते.”
लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट दिग्दर्शित १९८४ रोजी आलेल्या ‘सारांश’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, अनुपम खेर यांनी एकत्र काम केलं होतं. यामध्ये त्यांच्यासह अभिनेते निळू फुले, मदन जैन, सुहास भालेकर व सोनी राजदान हे कलाकार झळकले होते.