Anupam Kher Throws popcorn At Interviewer’s Face : पॉडकास्ट हा हल्ली फार चर्चेचा विषय ठरत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कलाकार वेगवेगळ्या पॉडकास्टला मुलाखत देताना दिसतात. अशातच लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा त्यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाच्या निमित्ताने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. परंतु, यावेळी त्यांनी मुलाखतकाराच्या चेहऱ्यावर चक्क पॉपकॉर्न फेकून मारले. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
१८ जुलै रोजी ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अनुपम खेर यांनी ‘चलचित्र टॉक्सला’ मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना “दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय शिकायला मिळालं” असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर अनुपम खेर यांनी “मी याबद्दल बोलणार नाही, कारण तू माझा चित्रपट पाहिला नाहीये,” असं उत्तर दिलं
मुलाखतकाराने पुढे त्यांना स्पष्टीकरण देत सांगितलं की, काल एक दिवसापूर्वीच संध्याकाळी ही मुलाखत करायची आहे हे नक्की झालं आणि त्यासाठी त्याने जयपूर ते मुंबई असा प्रवास केला. सकाळी ही मुलाखत होती. अनुपम म्हणाले, “त्याच्याकडे २० दिवस होते चित्रपट पाहण्यासाठी, मी प्रश्नाचं उत्तर देणार नाही, कारण तुला त्याचा संदर्भ कळणार नाही.” यावर मुलाखतकाराने सांगितलं की, निदान जे ही मुलाखत पाहणार आहेत आणि त्यांच्यातील ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल, त्यांना तरी याबाबत कळेल. परंतु, अनुपम म्हणाले, “त्यांच्यासाठी मी दुसऱ्या मुलाखतीत सांगेन.”
अनुपम खेर यांनी मुलाखतकाराच्या चेहऱ्यावर फेकले पॉपकॉर्न
अनुपम खेर यांनी पुढे सांगितलं की, एक आठवड्यापासून ते या मुलाखतीसंदर्भात चर्चा करत होते; परंतु मुलाखतकाराने हे स्वीकारलं नाही. ते म्हणाले, “यात स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही, तू मान्य करत नाहीयेस की तू तुझं काम नीट केलं नाहीस आणि एवढं होऊनही तू कारणं देत आहेस.” पुढे त्याने जेव्हा सांगितलं की, तो अनुपम यांच्या टीमबरोबर एक आठवड्यापासून संपर्कातच नव्हता तेव्हा अनुपम मागे वळले आणि तिथे असलेलं पॉपकॉर्न त्यांनी मुलाखतकाराच्या तोंडावर फेकले, पण ते खाली पडले. अभिनेते त्याला म्हणाले, “तुला माफी मागण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, मला जे वाटतं ते मी बोलतो.”
मुलाखतकाराने पुढे सांगितलं की, तो खूप घाबरलेला आणि त्या संभाषणात तो उपस्थितीच नाहीये असं त्याला वाटलेलं. जेव्हा अनुपम यांनी सांगितलं की, तू तुझा अभ्यास नीट केलेला नाहीये; तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. यावर अभिनेते म्हणाले, “जर तुला वाईट वाटलं असेल तर वाटायलाच हवं, मी तुझी मस्करी करत होतो,” असं म्हणून ते तिथून निघून गेले.