Anurag Kashyap Apology : दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘फुले’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबद्दल बोलताना ब्राह्मणांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी आता त्याने जाहीर माफी मागितली आहे. अनुरागने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून बोलताना मर्यादा ओलांडल्याची कबुली दिली आहे.

“रागाच्या भरात कोणाला तरी उत्तर देताना मी माझी मर्यादा विसरलो. आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाला वाईट म्हटलं. या समाजातील अनेक लोक माझ्या आयुष्यात होते, अजूनही आहेत आणि त्यांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे. आज ते सर्वजण माझ्यामुळे दुखावले गेले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबालाही दुःख झालं आहे. मी ज्यांचा आदर करतो असे सर्व बुद्धिजीवी लोक, रागात मी ज्या पद्धतीने बोललो त्यामुळे दुखावले आहे.
अशा पद्धतीने बोलून मी माझ्याच मूळ विषयाला भरकटवलं. या समाजाची मी मनापासून माफी मागतो, ज्यांना मला हे अजिबात बोलायचं नव्हतं, पण कुणाच्या तरी वाईट कमेंटला उत्तर देताना मी रागात हे लिहिलं.
मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल आणि अपमानास्पद भाषा वापरण्याबद्दल माफी मागतो.
पुन्हा असं होऊ नये, यासाठी मी काम करेन. मी माझ्या रागावर काम करेन. आणि जर मला एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर मी योग्य शब्दांचा वापर करेन.
तुम्ही मला माफ कराल, अशी मला आशा आहे,” असं अनुराग कश्यपने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याने आत्मनिरीक्षण असं कॅप्शन देऊन ही पोस्ट शेअर केली आहे.

अनुराग कश्यपची पोस्ट

‘फुले’ चित्रपटाचे समर्थन करताना अनुरागने ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन टीका केली होती. या पोस्ट खालील एका कमेंटला उत्तर देत असताना अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

अनुरागच्या या विधानानंतर त्याला धमक्या येत होत्या. नंतर त्याने दुसरी पोस्ट केली होती. “मी माफी मागतो पण माझ्या पोस्टसाठी नाही, तर जी एक ओळ लिहिली होती. ज्याला चुकीच्या पद्धतीने घेतले जात असून त्यावरून द्वेष पसरवला जात आहे. कुटुंब, मित्र, मुलगी आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेपेक्षा कोणतेही भाषण किंवा कृती मोठी नाही. त्यांना बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. जे स्वतःला संस्कारी म्हणतात, तेच लोक अशा धमक्या देत आहेत. मी जे बोललो ते शब्द मागे घेऊ शकत नाही. मला शिव्या द्यायच्या असतील तर द्या. माझ्याकडून माफीची अपेक्षा असेल तर माफी मागतो. पण ब्राह्मण लोकांनो महिलांना सोडा. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात हे ठरवा,” असं त्याने लिहिलं होतं.