शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई करताना दिसत आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचं बोललं जातंय. शाहरुखच्या जबरदस्त अॅक्शन अवताराने सर्वांनाच भुरळ घातली असून मोठ्या संख्येने प्रेक्षक या चित्रपट पाहत असल्याचं दिसून येत. यंदाच्या वर्षांतला हा पहिलाच ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यपने ‘पठाण’ आणि शाहरुख खानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
निर्माता अनुराग कश्यपने ‘पठाण’ला मिळत असलेल्या यशावर स्पष्ट शब्दात आपलं मत मांडलं आहे. एवढंच नाही तर त्याने शाहरुख खानचं कौतुकही केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाला, “शाहरुख एक दृढनिश्चयी व्यक्ती आहे. तो नेहमी विनम्र राहतो आणि प्रत्येक समस्येचा सामना शांतपणे करतो. यावेळी शाहरुखने स्क्रीनवरील त्याच्या कामातून उत्तर दिलं आहे. हे खूपच सुंदर आहे. त्याचा आवाज मोठ्या पडद्यावर घुमतोय. मला समजलंय की त्याला काय शिकवायचं आहे. त्याच्या मते, आपल्या कामातून उत्तर द्या, विनाकारण बोलू नका.”
‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या यशाबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, “लोक चित्रपट पाहण्यासाठी परत येत आहेत. लोक मोठ्या पडद्यासमोर नाचत आहेत. चित्रपटाबाबत ते खूप उत्साहित आहेत आणि त्यांचा हा उत्साह खूप कमाल आहे. हे बऱ्याच दिवसात कोणीही पाहिलं नव्हतं. हा उत्साह एखाद्या सामाजिक किंवा राजकीय वक्तव्याप्रमाणे आहे.”
आणखी वाचा- Video: शाहरुख खानसाठी काहीपण! ‘पठाण’ सुरू असताना चाहत्याने चित्रपटगृहात उडवल्या नोटा, व्हिडीओ चर्चेत
दरम्यान अगुराग कश्यप ‘पठाण’चा फर्स्ट डे शो पाहण्यासाठी गेला होता आणि चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर त्याने चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. अनुरागने ‘पठाण’चे कौतुक करण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे, अनुरागच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याचा पुढचा चित्रपट ‘ऑलमोस्ट इन लव्ह विथ डीजे मोहब्बत’ आहे. हा एक रोमँटिक संगीतमय चित्रपट आहे ज्यात विकी कौशल, अलाया एफ आणि करण मेहता मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे शाहरुख खानबद्दल बोलायचे तर तो नयनतारासोबत ‘जवान’ आणि तापसी पन्नूसोबत ‘डंकी’मध्ये दिसणार आहे.