रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. प्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांनी यावर टीका केली तर नुकतंच राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं कौतुक केल्याचं समोर आलं. चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळत असतानाच नुकतंच अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा : “मला तुमचे बूट चाटायचे…” ‘अ‍ॅनिमल’पाहून राम गोपाल वर्मा यांनी खास शैलीत केलं रणबीर व संदीप यांचं कौतुक

‘न्यूज १८ शोशा’मध्ये अनुरागने ‘अ‍ॅनिमल’वरुन होणाऱ्या चर्चेवर आणि त्यावर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. अनुराग याबद्दल म्हणाला, “मी अद्याप ‘अ‍ॅनिमल’ पाहिलेला नाही, पण चित्रपटाविषयी इंटरनेटवर होणारी चर्चा मला ठाऊक आहे. एखाद्या फिल्ममेकरने कसा चित्रपट काढावा आणि कसा काढू नये हे सांगायचा अधिकार कोणालाही नाही. एका चित्रपटामुळे या देशातील बरेच लोक दुखावले जातात. माझ्या चित्रपटाच्या बाबतीतही लोक असेच व्यक्त होतं, किमान शिकलेल्या लोकांकडून तरी मला असे वर्तन अपेक्षित नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे कबीर सिंहबद्दल बोलताना अनुराग म्हणाला, “कबीर सिंहच्या वेळेसही अशीच चर्चा झाली होती. फिल्ममेकरला त्याला जे हवंय ते दाखवायचा पूर्ण अधिकार आहे. आपण चित्रपटावर टीका करून शकतो, असहमती दर्शवू शकतो, वाद घालू शकतो. चित्रपट तुम्हाला चिथवतो किंवा झोपेतून जागं करतो, जे लोकांना चिथवणारे चित्रपट काढतात अशा फिल्ममेकर्सशी मला काहीच समस्या नाही.” अद्याप ‘अ‍ॅनिमल’ पाहिलेला नसून लवकरच तो पाहण्याची अन् त्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांच्याशी चर्चा करण्याचीही अनुरागने इच्छा व्यक्त केली.