Anurag Kashyap Talks About Shah Rukh Khan : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला बॉलीवूडचा किंग खान अशा नावानेही संबोधलं जातं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का शाहरुख खान फक्त अभिनयातच नाही, तर तो कॉलेजमध्ये असताना अभ्यासातही अव्वल होता. दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याच्याबरोबरच्या कॉलेजमधील आठवणी सांगितल्या आहेत.

शाहरुख खान व अनुराग कश्यप हे दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. त्यांनी दिल्लीतील हंसराज कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. अनुराग कश्यपनं ‘बुक माय शो’सह संवाद साधताना शाहरुख खानबरोबरच्या कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला आहे. अनुरागनं यावेळी शाहरुख खान कॉलेजमध्ये असताना खूप हुशार होता आणि अभ्यासाबरोबर तो स्पोर्टसमध्येही सक्रिय होता याबद्दल सांगितलं आहे.

अनुराग कश्यपने सांगितल्या शाहरुख खानबरोबरच्या आठवणी

शाहरुख खानबद्दल अनुराग कश्यप म्हणाला, “शाहरुख खानचा ‘दीवाना’ चित्रपट आला तेव्हा त्याला चित्रपटात पाहून आमच्या कॉलेजमध्ये मुलं वेडी झाली होती. त्यांनी पूर्ण थिएटर बुक केलं होतं. चित्रपटात जेव्हा शाहरुख खानची एन्ट्री झाली तेव्हा तो सीन पाहताना सगळ्यांनी टाळ्या वाजवीत त्याचं कौतुक केलं. आम्हाला खूप अभिमान वाटला होता की, आमच्या कॉलेजमधील मुलगा एका मोठ्या चित्रपटात झळकत आहे.”

अनुराग कश्यपनं शाहरुख खानबद्दल पुढे सांगितलं, “शाहरुख खान कॉलेजमध्ये आमच्या हॉकी टीमचा कॅप्टन होता. तो बास्केट बॉलचाही कॅप्टन होता. त्याला स्पोर्टसमन ऑफ द इयर हा पुरस्कारही मिळालेला. तो इकोनॉमिक्समध्येही टॉपर होता. तो खूप चांगला आहे आणि त्यामुळेच तर तो सुपरस्टार आहे.”

अनुरागनं शाहरुख खानबद्दल पुढे सांगितलं, “जेव्हा शाहरुखला माझं कुठलं काम आवडतं तेव्हा तो मला फोन करून तसं सांगतो आणि कौतुक करतो. ‘सेक्रेड गेम्स’च्या वेळीसुद्धा त्यानं फोन करून कौतुक केलं होतं”.

शाहरुख खान व अनुराग कश्यप या दोघांनी ‘हॅपी न्यू इयर’, ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एकत्र काम केलं नाही. अनुरागनं ‘ह्युमन्स ऑफ सिनेमा’शी संवाद साधताना सांगितलं होतं की, शाहरुख खानचा ‘चक दे इंडिया’ हा त्याचा आवडता चित्रपट आहे. त्याला त्याचा ‘कभी हा कभी ना’ हा चित्रपटही आवडतो.”