Anushka Sharma Reacts On Virat Kohli Test Retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आज ( १२ मे ) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत किंग कोहलीने त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटलं आहे. विराटने निवृत्ती घेतल्यावर बीसीसीआयसह क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील योगदानासाठी त्याचे आभार मानले आहेत.
विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक कसोटी सामना खेळल्यावर विराटमध्ये झालेला बदल, खेळाप्रती त्याचं असलेलं समर्पण अशा अनेक गोष्टींचं कौतुक करत अनुष्काने विराटच्या निवृत्तीवर आपली भावनिक प्रतिक्रिया पोस्टद्वारे शेअर केली आहे.
अनुष्का शर्मा लिहिते, “तुझे असंख्य रेकॉर्ड्स आणि कारकिर्दीतील माइलस्टोन याविषयी सगळेजण बोलतीलच. पण, तू कधीही न दाखवलेले अश्रू, खेळाच्या या फॉरमॅटसाठी तुझ्या मनात असलेलं अढळ प्रेम या सगळ्या गोष्टी मला काय आठवत राहतील. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तुझ्यात बदल होत गेला… तू थोडा शांत झालास, आणखी नम्र झालास आणि तुला या सगळ्या टप्प्यातून विकसित होताना पाहणं हे माझं भाग्य आहे. मी नेहमी अशीच कल्पना केली होती की, तू कसोटी सामन्यादरम्यान निवृत्त होशील. पण, तू नेहमीच तुझ्या मनाचं ऐकलं आहेस आणि म्हणूनच ‘माय लव्ह’ मी एवढंच सांगेन की, तू खेळाच्या या फॉरमॅटमध्ये आज सर्व काही मिळवलं आहेस.”
अनुष्काची ही भावनिक पोस्ट वाचून कमेंट्समध्ये विराटने लव्ह इमोजी दिले आहेत. तसेच ‘विरुष्का’च्या चाहत्यांनी देखील अभिनेत्रीची पोस्ट वाचून यावर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील ‘विराट’ कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आजवर खेळलेल्या १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९ हजार २३० धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतकं तर, ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.