Arbaaz Khan Wife Sshura Khan Welcome Baby Girl : अभिनेता अरबाज खान ५८ व्या वर्षी बाबा झाला आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खान दोन दिवसांपासून प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होती. शुराने गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. शुरा खान व अरबाज खान आता एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत.
अरबाज खान व शुरा खान यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी घरी चिमुकल्याचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. मागच्या आठवड्यात शुराचा बेबी शॉवर कार्यक्रम झाला होता. त्यानंतर तिला शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी प्रसूतीसाठी खार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुराची प्रसूती झाली असून तिने मुलीला जन्म दिला आहे.
शुराला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तिची आई, अरबाज खान सगळे रुग्णालयात पोहोचले होते. अरबाज व मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानदेखील शुराला भेटायला रुग्णालयात गेला होता. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शुरा व अरबाज खानच्या वयात २५ वर्षांचे अंतर
Arbaaz Khan Sshura Khan Age Gap : अरबाज व शुराच्या वयात तब्बल २५ वर्षांचे अंतर आहे. अरबाजचा जन्म ४ ऑगस्ट १९६७ रोजी झाला होता. तर शुराचा वाढदिवस १८ जानेवारीला असतो. ती ३३ वर्षांची आहे, तर अरबाज ५८ वर्षांचा आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार अरबाज खान व शुरा यांची भेट ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शुरा खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. तिने रवीना टंडनबरोबर बरीच वर्षे काम केलं आहे.
अरबाज व शुरा खानची लव्ह स्टोरी
Arbaaz Khan Sshura Khan Love Story : अरबाजचे पालक सलीम आणि सलमा खान, भाऊ सलमान व सोहेल आणि बहिणी अलविरा व अर्पिता खान यांना माहित नव्हतं की तो शुराला डेट करत आहे. “सुरुवातीला त्यांना माहित नव्हतं. मी कोणालातरी भेटत आहे, याची कल्पना त्यांना होती पण जेव्हा त्यांना समजलं की मी लग्न करत आहे, तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद झाला. अशावेळी तुमच्या जवळचे लोक तुम्हाला पाठिंबा देतात, कारण त्यांना माहित असतं की हे निर्णय दोन प्रौढ लोकांनी घेतले आहेत,” असं अरबाज खान एका मुलाखतीत म्हणाला होता.
अरबाज खानचं पहिलं लग्न मलायका अरोराशी झालं होतं. त्यांना २२ वर्षांचा मुलगा अरहान खान आहे. आता अरबाज एका मुलीचा बाबा झाला आहे.