Arshad Warsi on his interfaith marriage: बॉलीवूडचे कलाकार हे विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. चित्रपटांतील हसवणाऱ्या, रडवणाऱ्या तर कधी घाबरवणाऱ्या भूमिका लक्ष वेधून घेतात.

अनेकदा हे कलाकार मुलाखतींमध्ये विविध वक्तव्ये करतात. त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगचे किस्से, इतर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, तसेच वाद-विवाद अशा विविध गोष्टींबाबत ते बोलत असतात. तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही ते अनेक खुलासे करतात.

आता अभिनेता अर्शद वारसीने त्याच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत वक्तव्य केले आहे. अर्शद वारसी आणि मारिया गोरेट्टी यांनी ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १९९९ मध्ये लग्न केले. अर्शद हा मुस्लीम असून मारिया ही ख्रिश्चन आहे, त्यांचा हा आंतरधर्मीय विवाह होता.

अर्शद वारसीने नुकताच राज शमानीशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला की, त्याने पहिल्यांदा मारियाला एका नृत्यस्पर्धेत पाहिले होते. अभिनेता असेही म्हणाला की, आधी मारिया तिचे प्रेम व्यक्त करत नव्हती, पण जेव्हा तिने एकदा दारू प्यायली तेव्हा तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

अर्शद वारसी म्हणाला, “आम्ही खूप विचित्र होतो. ती खूप चांगली मुलगी होती. रोज सकाळी चर्चेमध्ये जायची. मला ती आवडली, कारण ती चांगला डान्स करत असे आणि ती खूप सुंदर दिसत असे. एका कॉलेजमधील स्पर्धेत डान्स स्पर्धा होती. मला तिथे जज म्हणून बोलावले होते. तेव्हा मी कोरिओग्राफर होतो. माझ्या मित्राने सांगितले की तिथे एक मुलगी आहे, त्या मुलीचे हास्य खूप गोड आहे.”

“मी जेव्हा परीक्षक म्हणून तिथे गेलो, त्यावेळी गोड हास्य असलेल्या मुलीला माझी नजर शोधत होती. ती मला दिसली. ती सुंदर होती आणि चांगली नर्तिका होता. मी तिला सांगितले की मी नाटकात काम करतो, जर तुला काम करायचे असेल तर आमच्याबरोबर काम करू शकतेस. पण, तिने नकार दिला.”

“ती माझ्या प्रेमात पडली…”

अभिनेता म्हणाला, “जेव्हा मी वांद्र्यामध्ये नाटकात काम करत होतो, त्यावेळी ती माझे नाटक पाहण्यासाठी आली. आमचे सादरीकरण पाहिले आणि तिला ते आवडले. त्यानंतर ती आमच्याबरोबर काम करू लागली. गोष्टी तिथूनच सुरुवात झाल्या. ती माझ्या प्रेमात पडली. मी तिच्या प्रेमात पडलो नव्हतो. तिने कधीच तिच्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्या नाहीत, पण तिचे हावभाव सगळं काही सांगत होते. माझे मित्रही मला म्हणायचे की तिला मी आवडतो. जेव्हा मी तिला विचारले, तेव्हा तिने माझ्या तोंडावर नकार दिला.”

मारियाने कशी प्रेमाची कबुली दिली याबद्दल अभिनेत्याने खुलासा केला. तो म्हणाला, “एकदा आमचा शो दुबईमध्ये होता, त्यावेळी या चांगल्या ख्रिश्चन मुलीला मी बिअर पाजली. अर्धी बाटली बिअर प्यायल्यानंतर तिच्या सगळ्या भावना बाहेर आल्या. त्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर फिरू लागलो. त्यानंतर आम्ही लग्न कले. जेव्हा मी तिच्याकडे पाहतो, तेव्हा मला कायम हेच जाणवते की ती खूप चांगली, सुंदर आहे. ती तिच्या पालकांची काळजी घेते. तिच्याबद्दल सर्वकाही चांगले आहे. तुम्हाला जे काही एका मुलीमध्ये हवे असते, ते सर्व तिच्यामध्ये आहे,” असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या पत्नीचे कौतुक केले आणि शेवटी गमतीने म्हणाला की फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ती वेडी आहे.

दरम्यान, अभिनेता नुकताच झी ५ वरील भागवत-चाप्टर १: राक्षस यामध्ये दिसला आहे. तसेच, तो आर्यन खान दिग्दर्शित वेब सीरिजमध्येदेखील दिसला होता.