Ayushmann Khurrana Wife Tahira Kashyap Breast Cancer: अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी व चित्रपट निर्माती ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा कर्करोगाचं निदान झालं आहे. ७ वर्षांपूर्वी ताहिराला २०१८ मध्ये पहिल्यांदा कर्करोग झाला होता. उपचारानंतर तिने या गंभीर आजारावर मात केली होती. त्यानंतर आता तिला पुन्हा एकदा स्तनांचा कर्करोग झाला आहे. ताहिराने यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे.

ताहिराला पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले तेव्हा आयुष्मानसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. २०१९ मध्ये एका पॉडकास्टमध्ये आयुष्मान खुरानाने एक प्रसंग सांगितला होता. जेव्हा त्याला कळलं की त्याच्या पत्नीला कर्करोग आहे, तेव्हा त्याची अवस्था कशी झाली होती, त्याबाबत आयुष्मानने माहिती दिली होती. “डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं तेव्हा आम्ही दोघे दिल्लीत होतो. आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं. एक वेळ अशी आली की आम्ही हादरलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. तिथल्या लोकांना माझ्याबरोबर फोटो काढायचे होते. पण मी एका खांबामागे लपलो होतो. सुरक्षा रक्षकालाही वाईट वाटत होतं,” असं आयुष्मान खुराना माय एक्स-ब्रेस्ट पॉडकास्टमध्ये म्हणाला होता.

आयुष्मानने केलेलं ताहिराचं कौतुक

ज्या पद्धतीने ताहिराने हिमतीने या आजाराशी लढा दिला ते पाहून आयुष्मान खुरानाने तिचं कौतुक केलं होतं. ताहिराला या आजारपणात अध्यात्माची खूप मदत झाली, असं आयुष्मानने सांगितलं होतं. “निचिरेन बौद्ध धर्म तुम्हाला लढण्याची हिंमत देतो. आता तू माझ्यासाठी एक विजयी राणी आहेस. मला खूप आनंद झाला की तू भावनिकदृष्ट्या इतकी मजबूत झाली आहेस की ही लढाई लढू शकतेस. या लढ्यात आपण दोघेही एकत्र होतो, पण मला तुझ्याकडून इतकी प्रेरणा मिळाली की तू माझ्यापेक्षा अधिक मजबूत झालीस. तुझी उपस्थिती कमाल आहे. हे तुझ्या हेअरस्टाईलबद्दल नाही, तर तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दल आहे. ही सगली तुला आयुष्यात आलेल्या अनुभवांची गोळाबेरीज आहे.”

ताहिरा कश्यपने केलेली पोस्ट नेमकी काय?

“सात वर्षांच्या नियमित तपासणीची शक्ती. खरं तर हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना नियमित मॅमोग्रामची गरज आहे, त्या सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी दुसरा राउंड…मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालंय,” असं ताहिराने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुष्मान व ताहिराची लव्ह स्टोरी

आयुष्मान व ताहिरा १२ वीत एकत्र होते. कोचिंग क्लासदरम्यान त्यांची ओळख झाली. आयुष्मान व ताहिरा दोघांचे वडील एकाच वृत्तपत्रासाठी काम करायचे, ते एकमेकांचे चांगले मित्र होते. एकेदिवशी दोघांच्या वडिलांनी जेवणाचा प्लॅन केला, तेव्हापर्यंत आयुष्मान व ताहिरा यांना त्याचे वडील मित्र असल्याचं माहीत नव्हतं. ते दोघेही एकमेकांना एकाच ठिकाणी बघून चकित झाले. तिथे आयुष्मानने ‘हमे तुमसे प्यार कितना’ हे गाणं गायलं आणि ताहिरा त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर २००८ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत.