Badshah Velvet Flow Song Hurting Religious Sentiments : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक व रॅपर बादशाह हा त्याच्या गाण्यांनी कायमच चर्चेत राहत असतो. आजवर त्यानं अनेक रॅप गाण्यांतून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. पण, नुकत्याच आलेल्या एका नवीन गाण्यामुळे बादशाह अडचणीत सापडला आहे. बादशाहचं ‘वेल्वेट फ्लो’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि या गाण्यामुळे तो वादात सापडला आहे. बादशाहच्या ‘वेल्वेट फ्लो’ या गाण्यामध्ये ख्रिश्चन धर्माबद्दल वापरल्या गेलेल्या शब्दांवरून आक्षेप घेण्यात आला आहे.
‘वेल्वेट फ्लो’ या गाण्यामध्ये वापरल्या गेलेल्या शब्दांवरून ख्रिश्चन समुदायात प्रचंड संताप आहे. त्यामुळे गायकाविरुद्ध पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बटाला शहरात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल ख्रिश्चन अॅक्शन कमिटीचे प्रतिनिधी इमॅन्युएल मसिह यांनी केलेल्या औपचारिक तक्रारीनंतर मंगळवारी (२९ एप्रिल) किला लाल सिंग पोलिस ठाण्यात रॅपर बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘वेल्वेट फ्लो’ गाण्यावर ख्रिश्चन समुदायाचा आरोप आहे की, या गाण्यात पवित्र बायबलचे संदर्भ आहेत आणि त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी पोलिस आयुक्तांकडे हे गाणे सोशल मीडियावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘वेल्वेट फ्लो’ गाण्याबाबत मंगळवारी बटाला येथेही निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी बादशाहवर व्यावसायिक फायद्यासाठी धर्म व पवित्र प्रतीकांचा अनादर केल्याचा आरोप केला आहे आणि त्याच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) गुरविंदर सिंग यांनी पुष्टी केली की, धार्मिक भावना दुखावण्याच्या मुद्द्यावर आधारित भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘वेल्वेट फ्लो’ हे गाणं बादशाहनं गायलं आहे आणि त्याचे बोलही त्यानंच लिहिले आहेत. तर ‘वेल्वेट फ्लो’चं संगीत हितेननं दिलं आहे. दरम्यान, त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबद्दल अद्याप त्यानं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बादशाहबद्दल सांगायचं झालं तर, २०१८ मध्ये आस्था गिलच्या ‘डीजे वाले बाबू’ या गाण्या गाण्याद्वारे बादशाहनं संगीत सृष्टीत पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यानं २०१९ मध्ये आलेल्या ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या बॉलीवूड चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, अन्नू कपूर व कुलभूषण खरबंदा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय तो ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘सुल्तान’, ‘कपूर अँड सन्स’ व ‘बजरंगी भाईजान’ यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटांमधील कामासाठी ओळखला जातो.