Bal Thackeray’s Grandson Aaishvary Thackeray Makes His Debut With Anurag Kashyap’s Crime Drama Nishaanchi : बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऐश्वर्यच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

ऐश्वर्य ठाकरे लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशातच आता या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर समोर आले असून यामध्ये ऐश्वर्यही पाहायला मिळतोय. ऐश्वर्य ठाकरे अनुराग कश्यप यांच्या ‘नीशांची’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे.

ऐश्वर्य ठाकरेचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं असून निर्मिती अजय राय व रंजन सिंह यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. तसेच ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार याबाबतही बरीच चर्चा होती. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून लवकरच बाळासाहेबांचा नातू बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘नीशांची’ या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेसह वेदिका पिंटो, मोनिका पानवार, मोहममद झीशान आयुब आणि कुमुद मिश्रा हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी याची तुलना अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘गुलाल’ आणि ‘मुक्केबाझ’ यांसारख्या चित्रपटांशी केली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरखाली कलाकार मंडळींनीही कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीने “अब आयेगा मजा”, संतोष जुवेकरने “सुपर”, विनीत कुमारने “धमाका हैं धमाका”, आदित्य कोठानेरे “व्हा” अशा कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहे.यासह नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत चित्रपटासाठी ते उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कलाकारांच्या कमेंट्स

‘नीशांची’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अनुराग कश्यपने याबाबत असं सांगितलेलं की, “आम्ही २०१६ मध्ये या चित्रपटाची कथा लिहिली होती तेव्हापासून मी यावर चित्रपट बनवण्याच्या विचारात होतो. मी अशा स्टुडिओच्या शोधात होतो, जे माझ्यावर विश्वास ठेवतील आणि तेव्हा अॅमेझॉनला ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. प्रेक्षकांचं प्रेम मिळालेल्या माझ्या प्रत्येक चित्रपटाबाबत असंच झालं आहे, मला दरवेळी चांगले निर्माते भेटले आहेत. नीशांची हा चित्रपट प्रेम, क्राईम, शिक्षा, छळ यावर आधारित आहे.”