Bhagyashree Made of Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने नुकताच तिचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाला चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्रीने माधुरीला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.
भाग्यश्री व माधुरी दीक्षित यांच्यात आजही मैत्री टिकून असल्याचे दिसते. भाग्यश्रीने माधुरी दीक्षितला शुभेच्छा देताना अभिनेत्रीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने १९९८ साली माधुरीचे स्केच काढले होते. ते देखील शेअर केले आहे.
हे फोटो शेअर करताना भाग्यश्रीने लिहिले की मिलियन डॉलर हसू असलेली माधुरी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. एक स्केच आहे जे मी खूप आधी (१९८८) काढले होते. मला माहित होते की आपण एके दिवशी मैत्रीणी असू. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.” यावर माधुरीने कमेंट करत भाग्यश्रीचे आभार मानले आहेत.

नेटकरी काय म्हणाले?
माधुरीसह अनेक चाहत्यांनी कमेंट करीत भाग्यश्रीने काढलेल्या या स्केचचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “सुंदर स्केच”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “हे स्केच खूप छान आहे. तुम्ही स्केचसाठी आणखी वेळ काढला पाहिजे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तू खरी कलाकार आहेस. अभिनय, स्वयंपाक आणि स्केच, सर्व काही उत्तम करतेस”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तुझी ही कला माहित नव्हती. स्केच खरंच खूप सुंदर आहे.”

“मला हे स्केच खूप आवडले”, “तुम्ही काढलेले आणखी स्केच पाहायला आवडतील”, अशा कमेंट करीत चाहत्यांनी भाग्यश्रीला कौतुक केले. तसचे माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरीने ‘दिल’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे भाग्यश्रीने स्केच काढल्याचे दिसत आहेत. तसेच भाग्यश्रीने माधुरीबरोबर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघीही अत्यंत सुंदर दिसत आहेत.


माधुरी व भाग्यश्री यांच्याबद्दल बोलायचे तर दोघीही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. १९८०-९० च्या दशकात दोघीही काम करत होत्या. भाग्यश्रीने ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानबरोबर प्रमुख भूमिकेत काम केले होते. तिची चित्रपटातील ही भूमिका चांगलीच गाजली. तिला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटातून ब्रेक घेतला. मात्र, माधुरी दीक्षितने बराच काळ बॉलीवूडमध्ये काम केले.
माधुरी दीक्षितचे अनेक चित्रपट मोठे गाजले. त्यामध्ये ‘हम आपके है कौन’, ‘कोयला’ असे अनेक चित्रपट आहेत. त्यानंतर तिने डॉक्टर श्रीराम नेनेंबरोबर लग्नगाठ बांधली व ती अमेरिकेला वास्तव्यास गेली. माधुरी दीक्षित नुकतीच भूल भुलैय्या ३ मध्ये दिसली होती. आता आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.