९० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या बॉबी देओलला मधली काही वर्षे बॉलीवूडमध्ये काम मिळालं नाही. बऱ्याच वर्षांनी ‘अॅनिमल’मधून बॉबी देओलने दमदार पुनरागमन केलं. नुकताच तो ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये झळकला होता. ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’चं दिग्दर्शन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने केलं आहे. बॉबी देओलने आता एका मुलाखतीत दारू सोडण्याबद्दल वक्तव्य केलं. तसेच त्याने आर्यन खानचंही कौतुक केलं.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने सांगितलं की त्याने दारू पूर्णपणे सोडून दिली आहे. दारू सोडल्यानंतर त्याचं आयुष्य आधीपेक्षा चांगलं झालं आहे. “होय, मी दारू सोडली आहे आणि त्यामुळे मला खरोखर खूप मदत झाली आहे. प्रत्येक व्यक्तीची जनुके वेगळी असतात आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन तुमच्यावर कसा परिणाम करू शकते हे कोणीही सांगू शकत नाही. काही लोकांमधील जनुके अशी असतात ज्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचे व्यसन जडते,” असं बॉबी देओल म्हणाला.
दारू सोडण्याचा निर्णय स्वतःच घेतल्याचं बॉबीने नमूद केलं. “आयुष्यात अशा संधी वारंवार मिळत नाहीत. त्यामुळे हा आवाज आतूनच यायला हवा. दारू सोडल्यापासून मी माणूस म्हणून आणखी चांगला झालो आहे, असं मला वाटतं. तसेच माझ्या ओळखीच्या प्रत्येकाशी माझे संबंध आता १०० पटीने चांगले झाले आहेत,” असं बॉबी देओलने सांगितलं.
बॉबी देओलने केलं आर्यन खानचं कौतुक
बॉबी देओलने ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’चा दिग्दर्शक आर्यन खानचं कौतुक केलं. आर्यन एक प्रतिभावान, कामावर फोकस असलेला शिस्तबद्ध चित्रपट निर्माता आहे, असं बॉबी म्हणाला. “हे माझ्या स्वतःच्या मुलाने मला म्हणण्यासारखं होतं की ‘मला हे हवं आहे, तुम्ही ते अशा पद्धतीने करावं, असं मला वाटतं. बॅड्स ऑफ बॉलीवूडचं सगळं श्रेय आर्यन खानचं आहे. त्याने ते संपूर्ण जगासमोर सिद्ध केलं आहे,” असं विधान बॉबी देओलने केलं.
बॉबी देओलचा आगामी सिनेमा
‘अॅनिमल’ आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील दमदार अभिनयानंतर, बॉबी आता संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल पार्क’मध्ये झळकणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, तृप्ती डिमरी आणि रश्मिका मंदाना यांच्या भूमिका आहेत.
