रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. मीडिया रीपोर्टनुसार ‘अ‍ॅनिमल’ने आत्तापर्यंत ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटात रणबीरबरोबरच बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या दोघांच्या कामाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉबी देओलला तर या चित्रपटामुळे एक वेगळी ओळखच मिळाली आहे. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान बॉबीने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे. ‘फिल्म कंपेनियन अॅक्टर्स अड्डा’मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉबी देओलने ही भूमिका स्वीकारताना यामागे त्याची मानसिकता कशी होती याबद्दल भाष्य केलं आहे.

बॉबी म्हणाला, “तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू असतात, तुमच्या कुटुंबासोबतचे तुमचे नातेसंबंध हे फार महत्त्वाचे असतात. जेव्हा मी हा चित्रपट करत होतो तेव्हा मला कथा सांगताना सांगितलं गेलं होतं की मी या चित्रपटाचा खलनायक नाही तर हीरोच आहे. माझ्या पात्राच्या आजोबांना आत्महत्या करताना मी पाहिलेलं आहे अन् त्यामुळेच माझी वाचा गेली आहे, हीच गोष्ट मी माझ्या ध्यानात ठेवली होती.”

आणखी वाचा : ‘मन्नत’मध्ये आहे विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था; शाहरुख खानच्या घराबद्दल ‘डंकी’ फेम विक्रम कोचरचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आपल्या परिवाराबद्दल बॉबी म्हणाला, “आम्ही देओल मंडळी ही फार भावुक आहोत, पण आम्ही एकमेकांसाठी काहीही करायला तयार आहोत. मी आज ५४ वर्षांचा आहे, जीवनात मी सुख दुःखाचे क्षण भरपुर पाहिले आहेत. दुःखाच्या वेदना या फार भयानक असतात. जेव्हा तुम्ही चित्रपटातील शेवटची माझी आणि रणबीरची लढाई पहाल तेव्हा त्यात नेमका हीरो आणि व्हिलन कोण आहे हे तुम्हाला समजणार नाही. कारण दोघांचाही प्रवास सारखाच आहे. आपल्या आसपास जे घडतंय त्याचंच प्रतिबिंब या चित्रपटात पाहायला मिळतं.” ‘अ‍ॅनिमल’मधील बऱ्याच सीन्समुळे वादंग निर्माण झालं, वेगवेगळ्या स्तरातून चित्रपटावर टीकाही झाली. तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.