१९८७ मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात अनिल कपूरने एका सामान्य माणसाची भूमिका साकारलेली; जो घड्याळ घातल्यानंतर अदृश्य होत असे. या चित्रपटात श्रीदेवी यांची मुख्य भूमिका होती, तर अमरीश पुरी यांनी मोगॅम्बोची भूमिका साकारली होती. हा चित्रपट मे १९८७ मध्ये प्रदर्शित झाला आणि हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही हाच होता.
या चित्रपटातील अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या भूमिका लक्षात राहिल्या, तसाच अमरीश पुरी यांनी साकारलेला मोगॅम्बोसुद्धा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? या मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांच्या आधी अनुपम खेर असणार होते. मात्र, त्यांना काढण्यात आलं. याबद्दल स्वत: अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये अनुपम खेर यांना, त्यांना शेवटचा केव्हा मत्सर वाटला? असे विचारण्यात आले. यावर अनुपम यांनी उत्तर देत म्हटलं, जेव्हा मला ‘मिस्टर इंडिया’मधून काढून टाकलं आणि मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांना घेतलं, तेव्हा मला त्यांच्याविषयी मत्सर वाटला होता. तसंच मला स्वत:बाबत कमीपणा आणि वाईट वाटलं. मला का काढलं गेलं असा प्रश्न तेव्हा माझ्या मनात आला.”
अनुपम खेर इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर ते म्हणाले, “मला मान्य आहे की हे अगदीच सहाजिक आहे. पण, ते मला आता समजत आहे. पण, त्या काळात मी स्वत:ला खूप कमी आणि दुर्लक्षित समजलं होतं. माझ्या डोक्यात सतत ‘तो रोल त्याला कसा काय मिळाला?’ हेच येत होतं.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं होतं की, ‘मिस्टर इंडिया’चं बरंच शूटिंग झाल्यानंतर त्यांना चित्रपटातून काढण्यात आलं होतं. याबद्दल ते म्हणालेले, “मोगॅम्बोची भूमिका आधी मला देण्यात आली होती, मात्र एक-दोन महिन्यांनी निर्मात्यांनी मला काढून अमरीश पुरी यांना घेतलं. चित्रपटातून काढून टाकल्यानंतर वाईट वाटणं सहाजिक आहे, पण जेव्हा मी ‘मिस्टर इंडिया’ पाहिला, त्यातील अमरीशजींचं काम पाहिलं, तेव्हा मला वाटलं की निर्मात्यांनी योग्य निर्णय घेतला.”