बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी व त्याची पत्नी मारिया गोरेटीवर सेबीकडून एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार करून आर्थिक लाभ मिळविल्याप्रकरणी अर्शद, त्याची पत्नी व इतरांसह एकूण ४५ जणांवर गुरुवारी(२ मार्च) कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बाजार नियामक ‘सेबी’ने एक वर्षासाठी भांडवली बाजारातील व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. सेबीच्या बंदीनंतर अर्शद वारसीने संबंधित प्रकरणाबाबत ट्वीट केलं आहे.

अर्शद वारसीने साधना ब्रॉडकास्टच्या समभागांच्या किमती फुगवून २९.४३ लाख रुपये आणि त्याच्या पत्नीला ३७.५६ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. तसेच त्याचा भाऊ इक्बाल हुसैन वारसीला ९.३४ लाखांची कमाई झाली आहे, असे सेबीने नमूद केले आहे. याप्रकरणी अर्शद वारसीने ट्वीट करत शेअर मार्केटचं शून्य ज्ञान असल्याचं म्हटलं आहे. “प्रसारीत होणाऱ्या सगळ्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नका. शेअर मार्केट व स्टॉक संदर्भात मला व माझी पत्नी मारीयाला काहीही ज्ञान नाही. कोणाच्या तरी सल्ल्याने आम्ही शारदा आणि इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये आम्ही मेहनतीने कमावलेला पैसा गमावला आहे”, असं वारसीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> राखी सावंतच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार! कोण साकारणार मुख्य भूमिका? चित्रपटाचं नाव आहे…

नेमकं प्रकरण काय?

यूटयूब वाहिनीवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओतून दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार करून आर्थिक लाभ मिळविल्याचा आरोप वारसी दाम्पत्य व अन्यांवर करण्यात आला आहे. दूरचित्रवाणी वाहिनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि नवी दिल्लीस्थित प्रसारण क्षेत्रातील कंपनी शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची शिफारस करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटयूब व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे.

तक्रारीची दखल घेऊन, नियामकांनी एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतील संबंधित दोन कंपन्यांच्या समभागांसंबंधी रीतसर तपासणी केली आणि त्यात एप्रिल ते जुलै २०२२ च्या मध्यापर्यंत दोन कंपन्यांच्या समभागांची किंमत आणि उलाढालही लक्षणीय वाढली असल्याचे दिसून आले. जुलै २०२२ च्या उत्तरार्धात, साधनाविषयी खोटे आणि दिशाभूल करणारे ‘द अ‍ॅडव्हायजर’ आणि ‘मनीवाइज’ हे दोन व्हिडीओ यूटय़ूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आले होते. शार्पलाइनबद्दलही गेल्या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात ‘मिडकॅप कॉल्स’ आणि ‘नफा यात्रा’ शीर्षक असलेले दोन व्हिडीओही प्रसारित करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाई काय?

नियामकांनी दोषी ४५ जणांना, पुढील आदेश दिला जाईपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे/ समभागांची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले गेले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सर्वाना ‘सेबी’च्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये शिल्लक असलेल्या पैशासह जंगम किंवा स्थावर कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू नये असे निर्देश दिले गेले आहेत