अनेक सेलिब्रिटींना पाळीव प्राणी खूप आवडतात. ते आपल्या मुलांप्रमाणे प्राण्यांना जपतात, पण एका बॉलीवूड अभिनेत्याचा संसार त्याच्या श्वानांमुले मोडला. अभिनेत्याने थाटामाटात प्रेम विवाह केला होता, पण अवघ्या तीन वर्षांत त्याचा घटस्फोट झाला.
बॉलीवूड अभिनेता म्हणजे अरुणोदय सिंगने १३ डिसेंबर २०१६ रोजी मोठ्या थाटामाटात गर्लफ्रेंडशी लग्न केलं होतं. त्याची पत्नी ली एल्टन ही मूळची कॅनडाची होती. त्यांचा विवाहसोहळा भारतात पार पडला होता. पण हे दोघे तीन वर्षातच वेगळे झाले. २०१९ मध्ये अरुणोदय व ली एल्टन यांचा घटस्फोट झाला, या घटस्फोटाचं कारण म्हणजे त्याचं त्याच्या श्वानांवर असलेलं प्रेम होतं.
अवघ्या ३ वर्षात घटस्फोट
अरुणोदयला श्वान खूप आवडतात. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर श्वानाबरोबरचे त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात. लग्नानंतर ली एल्टनला श्वानांच्या आवाजाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे या जोडप्यात कुरबूर होऊ लागली. घरातील श्वान सतत भुंकायचे, त्यामुळे अरुणोदयच्या पत्नीला त्रास होऊ लागला. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले आणि अरुणोदय व ली एल्टन यांच्यातील तणाव वाढला. शेवटी नात्यात दुरावा येऊन त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांनी कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१९ मध्ये ते वेगळे झाले.
अरुणोदयचा घटस्फोट होऊन आता सहा वर्षे झाली आहेत, पण त्याने दुसरे लग्न केलं नाही. ४२ वर्षांचा अरुणोदय सिंगल आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही. त्याला पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे. तसेच तो त्याच्या श्वानांबरोबर वेळ घालवतो. अरुणोदयचे फोटो पाहिल्यास त्यात त्याचे पाळीव श्वान दिसतात.
अरुणोदय सिंगचे चित्रपट
अरुणोदय सिंगने बॉलीवूडमध्ये फार काम केलं नाही. मोजकेच चित्रपट केले, पण त्याने या अभिनेत्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली. अरुणोदयने १६ वर्षांपूर्वी २००९ मध्ये ‘सिकंदर’मधून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. नंतर त्याने ‘जिस्म २’, ‘मैं तेरा हीरो’, ‘मिस्टर एक्स’, ‘ब्लॅकमेल’ व ‘मोहेनजोदडो’ हे चित्रपट केले.
अरुणोदयने या सर्व चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या; मात्र, त्याला बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला नाही. नंतर त्याने ओटीटीवरही काम केलं. तो ‘अपहरण’ या वेब सीरिजमध्ये झळकला होता. त्याच्या आगामी प्रोजेक्टचं नाव ‘श्रीमान’ आहे.