Shah Rukh Khan Rejected These Movies : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. कित्येक वर्षांपासून तो त्याच्या सहजसुंदर अभिनय आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. लवकरच अभिनेता त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार आहे.
शाहरुख खानने आजवर काम केलेले अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. परंतु, तुम्हाला माहीत आहे का असेही काही चित्रपट आहेत, ज्याला शाहरुख खानने नकार दिलेला; पण नंतर ते सुपरहिट ठरले. त्यामध्ये ‘रंग दे बसंती’ ते ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट, ज्यासाठी शाहरुख खानला विचारणा झालेली; परंतु त्याने नकार दिला आणि तेच चित्रपट हिटसुद्धा ठरले.
शाहरुख खानने ‘या’ चित्रपटांना दिलेला नकार
रंग दे बसंती – ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील आमिर खानच्या भूमिकेसाठी आधी शाहरुख खानला विचारणा झालेली. परंतु, त्याच्या तारखा न जुळल्याने त्यानं या चित्रपटातून माघार घेतली आणि हा चित्रपट आमिर खानकडे गेला. २८ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटानं भारतात ७५ कोटींची कमाई केलेली.
लगान – आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ चित्रपटासाठीसुद्धा आमिर खानच्या आधी शाहरुख खानला विचारणा झालेली. परंतु, त्याला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नव्हती.
३ इडियट्स – आमिर खानचा अजून एक सिनेमा, ज्यामधील रांचोच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारणा झालेली. परतु, माध्यमाच्या वृत्तानुसार त्याच्या तारखा जुळत नव्हत्या आणि त्यावेळी अभिनेत्याला जखम झालेली, ज्यामुळे त्याला या चित्रपटातून माघार घ्यावी लागली.
मुन्नाभाई एमबीबीएस – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा संजय दत्तच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का यातील संजय दत्तच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारणा झालेली आणि त्याने होकारसुद्धा दिलेला; परंतु अचानक झालेल्या अपघातामुळे त्याला या चित्रपटामधूनही माघार घ्यावी लागलेली.
एक था टायगर – सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘एक था टायगर’ला शाहरुख खानने काही वैचारिक मतभेदांमुळे आणि तारखा न जुळल्यामुळे नकार दिला होता.
जोधा अकबर – २००८ साली आलेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ चित्रपटातील अकबरच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारण्यात आलेलं; परंतु त्यानं काही कारणांमुळे या चित्रपटाला नकार दिल्याचं म्हटलं जातं.
