गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी-हिंदी भाषेवरुन वादंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने केलेल्या पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीनंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. हिंदी सक्तीबद्दल अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मराठी इंडस्ट्रीतील काही दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांची मतं व्यक्त केली आहेत.
मराठी कलाकारांबरोबरच अनेक बॉलीवूड कलाकारांनीसुद्धा हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अजय देवगण, शिल्पा शेट्टी यांच्यासह काही टीव्ही कलाकारांनीसुद्धा थेट न बोलता भाषेची जाणीव असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता याबद्दल अभिनेता आर. माधवनने त्याचं मत व्यक्त केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याला भाषेमुळे कधी कोणती अडचण आली का? असा प्रश्न विचारण्यात आला.
याबद्दल आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत आर. माधवन म्हणाला, “मी तामिळ भाषिक आहे; पण मला हिंदी भाषा उत्तम येते. मी जमशेदपूरमध्ये मोठा झालो आहे, तिथं हिंदीच बोलली जायची. त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये राहिलो, तिथे मी मराठी शिकलो. त्यामुळे भाषेची अडचण कधीच वाटली नाही. मी जिथे राहिलो, तिथली भाषा शिकलो. त्यामुळे मला कधी संवाद साधण्यात अडचण आली नाही.”
आर माधवन इन्स्टाग्राम पोस्ट
आर. माधवन आपल्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच तो सामाजिक मुद्द्यांवरही आपलं मत मोकळेपणाने मांडतो. आता त्याने भाषेबाबतही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
दरम्यान, आर. माधवनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच त्याचा ‘आप जैसा कोई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख ही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. याआधी माधवन ‘केसरी २’ या चित्रपटात झळकला होता, ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.