अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या कियारा आडवाणीबरोबर लग्नाच्या चर्चेमुळे आणि त्याच्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘शेरशहा’ चित्रपटातील भूमिकेसाठी सिद्धार्थची खूप प्रशंसा झाली. त्यासाठी त्याला वेगवेगळे पुरस्कारही मिळाले. आता सिद्धार्थ त्याच्या आगामी ‘थॅंक गॉड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे थोडा वादही निर्माण झाला पण आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
यानिमित्ताने सिद्धार्थने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. याबरोबरच त्याने आजवर कॉमेडी चित्रपटात काम का केलं नाही याविषयीही सिद्धार्थने भाष्य केलं आहे. शिवाय त्याने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. सिद्धार्थ म्हणाला, “मी या चित्रपटाची कथा कोविड यायच्या आधीच ऐकली होती. ही कथा ऐकून मी खूप हसलो आणि हे पात्र मला प्रचंड आवडलं. ही कथा आजच्या काळातील लोकांना नक्की आवडेल. हा एक फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे. संपूर्ण कुटुंब या चित्रपटाचा आनंद घेईल आणि शेवटी प्रत्येकाला विचार करायलाही भाग पाडेल.”
आणखी वाचा : “कांतारासारखा धडा…” चित्रपटाचं कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूडकरांना सुनावले खडेबोल, ट्वीट चर्चेत
आपल्या पात्राविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “मी या चित्रपटात अयान कपूर या एका महत्त्वाकांक्षी उद्योगपतीची भूमिका साकारत आहे. एका अपघातामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील केलेल्या चुकांची जाणीव होते. माझा स्वतःचा कर्मावर खूप विश्वास आहे. या चित्रपटातही कर्म आणि त्यासंबंधीत गोष्टी फक्त विनोदी अंगाने दाखवल्या आहेत. चित्रपट बघून बाहेर पडताना तुम्ही काहीतरी चांगला विचार घेऊन बाहेर पडाल याची मला खात्री आहे.”
सिद्धार्थचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर २५ ऑक्टोबर रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थबरोबर यामध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय देवगण यामध्ये चित्रगुप्त यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्या या भूमिकेच्या लूकवरुन सध्या बरीच चर्चा होत आहे. शिवाय यामध्ये नोरा फतेहीददेखील एका गाण्यात आपल्याला थीरकताना दिसत आहे. तीचं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.