Tusshar Kapoor Took Blessings of Lalbaugcha Raja : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनालाही दरवर्षी अनेक भाविक जात असतात. दरवर्षी अनेक मराठी, बॉलीवूड सेलिब्रिटीही ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला जातात.
आता बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरनेही ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतलं आहे. तुषार कपूरने लालबागचा राजाच्या दर्शनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा अनुभव सांगितला आहे. ‘लालबागचा राजा’च्या दरबारातून तुषारने काही फोटो शेअर केले आहेत. त्याने या फोटोला कॅप्शनदेखील दिलं आहे. “गर्दीतून लालबागचा राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही यावेळी केलं, पण बाप्पाने आम्हाला पाहिलं आणि हे सगळं नेहमीप्रमाणे सार्थकी लागलं”, असं त्याने कॅप्शन दिलं आहे. तुषारच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
तुषार कपूर काही मोजक्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल’ या सिनेमातील त्याची ‘लकी’ची भूमिका विशेष गाजली. या सिनेमाच्या १ ते ४ या भागांमध्ये त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल फ्रेंचायझी फारच हिट ठरली आणि तुषारच्या करिअरसाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरली.
तुषार कपूरने ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तुषारचा पदार्पणचा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याच्याबरोबर करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. चांगली सुरुवात करूनही तुषारच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. पहिल्या हिटनंतर मात्र तुषारला म्हणावं तसं नाव कमवता आलं नाही.
तुषार कपूरनं आपल्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १९ फ्लॉप चित्रपट दिले आहेत. अभिनेत्याने आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली खरी, पण तो वडिलांप्रमाणे सुपरस्टार बनू शकला नाही. चांगल्या भूमिकांसाठी तो आजही स्ट्रगल करताना दिसतो.
तुषार कपूरने ‘गोलमाल’, ‘क्या कूल है हम’, ‘गुडबॉय बॅडबॉय’, ‘ढोल’, ‘कुछ तो है’, ‘शोर इन द सिटी’, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘चार दिन की चांदनी’ अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अनेक चित्रपटांची त्याने निर्मितीही केली आहे.