अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. वरुण आणि क्रितीदेखील सेटवरील फोटो पोस्ट करत वेळोवेळी चाहत्यांना चित्रपटाचे अपडेट्स देत होते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्या दोघांचे लूक्स समोर आले होते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि कॉमेडीचं जबरदस्त मिश्रण दिसून येत आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेलरवर नेटकरी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. याच चित्रपटाबद्दल आणि एका वेगळ्या भूमिकेबद्दल अभिनेता वरूण धवनने या पात्राबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान वरूणने या पात्रासाठी नेमकी कशी तयारी केली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत वरूणने दिग्दर्शक अमर कौशिल यांचं कौतुक केलं.
आणखी वाचा : “जे घडून गेलं ते…” बॉलिवूडमधील नेपोटीजमवर उत्तर देणाऱ्या अभिनेत्री यामी गौतमचं ट्वीट चर्चेत
वरूण म्हणाला, “जेव्हा अमरबरोबर मी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं तेव्हा त्यांनी मला निक्षून सांगितलं की तू यात अजिबात कॉमेडी करायची नाहीस. तरीही मी त्यांच्याकडे सतत पंचलाईन्स मागायचो. पण प्रेक्षकांनी माझ्या पात्राला गांभीर्याने घ्यावं यासाठी अमरनी खूप मेहनत घेतली आहे. मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे.” वरूणच्या या वक्तव्याला अभिनेत्री क्रीती सनॉन हिनेही दुजोरा दिला आणि वरूणच्या कामाचं कौतुक केलं आहे.
दिग्दर्शक अमर कौशिक यांचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी त्यांनी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ आणि आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना उदंड प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षक त्यांच्या या ‘भेडिया’साठी चांगलेच उत्सुक आहेत. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वरुण, क्रिती यांच्यासह दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.