Bollywood Actress Shot By Her Husband : मनोरंजन सृष्टी ही बाहेरून जितकी झगमगती आणि आकर्षक वाटते, तितक्याच तिच्यामागे कलाकारांच्या दुःखद कहाण्या असतात. इंडस्ट्रीतल्या बाहेरून दिसणाऱ्या झगमगाटामागे काहींच्या आयुष्यातील हृदयद्रावक सत्य लपलेलं असतं. अशीच एक कहाणी आहे प्रसिद्ध अभिनेत्री सईदा खान यांची.
सईदा खान या लहानपणीच चित्रपटसृष्टीत आल्या. सईदा यांचं संपूर्ण आयुष्य हे संघर्षमय होतं. सईदा खान यांचा जन्म कोलकातामध्ये झाला. त्यांच्या आई अनवारी बेगम या चित्रपटांतील नर्तिका होत्या. त्यांचं उत्पन्न फक्त घरखर्च भागवण्यापुरतं होतं. त्यामुळे सईदा यांनी वयाच्या ११व्या वर्षीच काम करण्यास सुरुवात केली.
एका चित्रपटाच्या पार्टीत दिग्दर्शक एच.एस. रावैल यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला १९६१ मध्ये आलेल्या ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात मनोज कुमार यांच्याबरोबर प्रमुख भूमिका दिली. त्यानंतर त्या किशोर कुमार यांच्याबरोबर ‘अपना हाथ जगन्नाथ’ मध्येही झळकल्या.
सईदा खूप महत्वाकांक्षी होत्या. त्यांना कायम वाटायचं की, हे यश तिला मोठं स्टार बनवेल, पण तसं काही झालं नाही. काही काळानंतर कामं कमी होऊ लागली आणि जे मिळेल ते काम स्वीकारायला त्यांनी सुरुवात केली. पण १९६० च्या अखेरीस ती संधीसुद्धा कमी होत गेली. अशाच काळात सईदा यांची ओळख निर्माता बृज सदाना यांच्याशी झाली.
बृज सदाना यांनी सईदा यांना लग्नासाठी विचारलं आणि त्यांना होकारही दिला. लग्नासाठी सईदा यांनी स्वत:चा धर्म बदलला, शिवाय सुधा सदाना असं स्वत:चं नावही बदललं. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. नम्रता नावाची एक मुलगी आणि कमल सदनाचा मुलगा.

पण त्यांच्या भूतकाळचा वर्तमानावर परिणाम होत राहिला. बृज सदाना यांना शंका होती की, सईदा यांचे लग्नाआधी एक मूल होतं, जे त्यांची आई अनवारी बेगम वाढवत होती. या गोष्टीमुळे बृज यांना कायम त्रास होत असे. मग एके दिवशी मुलगा कमलच्या २० व्या वाढदिवसाची पत्नी सईदा (सुधा), मुलगी नम्रता आणि मुलगा कमल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि स्वतःवरही.
या हल्ल्यातून फक्त कमल जिवंत वाचला. त्याने सगळ्यांना रुग्णालयात नेलं, पण कुणाचेही प्राण वाचले नाहीत. याबद्दल सिद्धार्थ कननशी साधलेल्या संवादात कमलने म्हटलं होतं, “माझी आई आणि बहीण रक्ताच्या थारोळ्यात होती, मी त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेत होतो आणि तेव्हा लक्षात आलं की, मलाही गोळी लागली आहे”.
या दुःखद घटनेनंतर काही वर्षांनी कमल सदानाने अभिनेत्री काजोलबरोबर चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण काही चित्रपटांनंतर त्यानेही ही इंडस्ट्री सोडून दिली.
दरम्यान, सईदा खान यांचं आयुष्य झगमगाटाच्या मागे लपलेली एक दुःखद कथा आहे – जिथे संघर्ष, शंका, प्रेम, व्यथित मनं आणि एका क्षणात उध्वस्त झालेलं कुटुंब आहे. त्यांच्या आयुष्यातील घटनांनी दाखवून दिलं की, ग्लॅमरच्यामागचं वास्तव हे कधीकधी खूप वेगळं असतं.