Bollywood Actress Public Harassment Incident : मनोरंजन सृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींबरोबर बऱ्याचदा गैरवर्तन किंवा अश्लील कृत्य घडल्याच्या घटना समोर येत असतात. याबद्दल काही अभिनेत्री मोकळेपणाने सांगतात, तर काही याबद्दल मौन बाळगतात. मनोरंजन विश्वातल्या काही अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबरच्या गैरप्रकाराबद्दल सांगितलं आहे. अशातच बॉलीवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही तिच्या समोर एका व्यक्तीने अश्लील वर्तन केल्याचा प्रसंग सांगितला आहे.
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोहा अली खानने इटलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. Hauterrfly च्या The Male Feminist या पॉडकास्टच्या नुकत्याच एका भागात, सोहाने इटलीमध्ये दिवसाढवळ्या तिच्यासमोर एक व्यक्ती अश्लील वर्तन करत असल्याचं सांगितलं.
या पॉडकास्टमध्ये तिला विचारण्यात आलं की, “कधी सार्वजनिक ठिकाणी एखादा अश्लील अनुभव आलाय का?” यावर ती म्हणाली, “इटलीमध्ये एकदा असं घडलं. तिथे म्हणे असं नेहमीच घडतं. पण दिवसा? खरंच, त्यांचा हेतू काय असतो? मला अजिबात समजत नाही आणि खरं तर, त्यांच्या मनात काय चालतंय हे समजून घ्यायची आपली इच्छाही नसते.”
यानंतर ती सांगते, “माझं आयुष्य खूपच सुरक्षित राहिलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वाईट अनुभव मला आले नाहीत, याचा मला आनंद आहे. पण मला माहित आहे की, दररोज सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या कितीतरी महिलांना काही ना काही त्रास सहन करावा लागतो.”
या क्षेत्रात कास्टिंग काउच किंवा वाईट अनुभव येणं नवं नाही. मात्र, सोहा म्हणते की, तिची पार्श्वभूमी आणि ओळख यामुळे तिला अशा गोष्टींपासून वाचता आलं. याबद्दल सोहा म्हणाली, “मी एका फिल्मी घराण्यातून आले असल्यामुळे लोकांना नेहमी वाटायचं की, ‘सैफ आहे, शर्मिलाजी आहेत’. त्यामुळे मला अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं नाही, याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते.”
सोहा अली खान इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, अभिनेत्री सोहा अली खान बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर असली, तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टी ती वेळोवेळी शेअर करत असते. यामुळे ती कायमच चर्चेत राहते. तिच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती शेवटची ‘छोरी २’ या हॉरर थ्रिलर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने दासी आईची भूमिका साकारली होती.