शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला असो, सलमानचं ‘गॅलक्सी’ अपार्टमेंट किंवा अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला…आपले आवडते बॉलीवूड स्टार्स कुठे राहतात, त्यांचं घर आतून कसं आहे हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. अलीकडच्या काळात सगळे कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या आलिशान घराची झलक सोशल मीडियावर दाखवलेली आहे.
सध्या बॉलीवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आलिशान घराची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सोनम कपूर. बॉलीवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींमध्ये सोनमचं नाव घेतलं जातं. ती अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे. सोनमने २०१८ मध्ये व्यावसायिक आनंद आहुजाशी लग्न केलं. अभिनेत्रीचं सासर दिल्लीत आहे.
सोनम आणि आनंद कामानिमित्त लंडन येथे राहतात. पण, ते सणासुदीला, कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात येत असतात. आहुजा कुटुंबीयांचा दिल्लीत आलिशान बंगला आहे. आनंदचे वडील हरीश आणि आई प्रिया आहुजा याठिकाणी राहतात. सोनम आणि आनंद यांची लंडन आणि मुंबईतही घरे आहेत.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचं दिल्लीतील घर पृथ्वीराज मार्ग या परिसरात आहे. अभिनेत्रीच्या बंगल्याच्या आजूबाजूला मोठी बाग आहे. सोनम आणि तिचा मुलगा वायु हे दोघंही मायलेक या लॉनमध्ये बऱ्याचदा खेळत असतात, याचे फोटोही अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोनमच्या घराच्या भिंती आकर्षक पेंटिंग्ज आणि छायाचित्रांनी सजवलेल्या आहेत. अभिनेत्रीच्या सासरचं घर कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नाहीये. आधुनिक सुख-सुविधांनी सुसज्ज अशा या घराच्या प्रवेशद्वारावर नंदीची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. याशेजारी चांदीचे हत्ती देखील ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर घरातील टेबल्स फुलांनी सजवण्यात आले आहेत.
आहुजा कुटुंबीयांचा दिल्लीतील हा आलिशान बंगला सुमारे ३,१७० चौरस यार्डमध्ये पसरलेला आहे. या बंगल्याची किंमत १७३ कोटींच्या घरात आहे. याच बंगल्यात सोनमने तिचा मुलगा वायुचा पहिला वाढदिवस सुद्धा साजरा केला होता.
दरम्यान, सोनम कपूरच्या या आलिशान बंगल्यात बास्केटबॉल कोर्ट सुद्धा आहे. अभिनेत्रीच्या घराचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.