बॉलीवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या कार्यकाळात फारसे वैविध्यपूर्ण चित्रपट करण्यात यशस्वी ठरले नाहीत किंवा फार लवकर त्यांना गाशा गुंडाळावा लागला. अशा कलाकारांपैकी काहीजणांना आता ओटीटीमुळे एक नवी ओळख मिळाली आहे. ओटीटीवरील वेबमालिका आणि चित्रपटांमुळे उशिरा का होईना मिळालेल्या यशामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या मोठय़ा कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता बॉबी देओल. ‘आश्रम’ या त्याच्या वेबमालिकेने त्याला ‘न भूतो न भविष्यति ’असे यश मिळवून दिले आहे. त्याच्या या वेबमालिकेचा चौथा सिक्वेल येऊ घातला आहे. आता मिळालेले यश सुखावणारे असले तरी एक काळ असा होता की पदार्पणाच्या चित्रपटासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागली होती आणि त्यामुळे त्रासलो होतो, असे बॉबीने एका मुलाखतीत सांगितले.
‘बरसात’ या १९९५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉबी देओलने नायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रदर्शनासाठी अनेक अडथळय़ांचा सामना करावा लागला होता. ‘बरसात’चे दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते. त्यांनी २७ दिवसांचे चित्रीकरण केले आणि त्याच वेळी त्यांना ‘बँडिट क्वीन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी विचारणा झाली. शेखर कपूर यांनी ‘बँडिट क्वीन’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर ‘बरसात’चे चित्रीकरण सुरू करूयात असे चित्रपटाचे निर्माते अभिनेते धर्मेद्र यांना सांगितले होते. मात्र बॉबीच्या पदार्पणाचा चित्रपट लांबू नये या विचाराने धर्मेद्र यांनी शेखर कपूर यांच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यांनी तुम्ही ‘बँडिट क्वीन’ करा, आम्ही दुसरा दिग्दर्शक शोधतो, असे शेखर कपूर यांना सांगितले. त्यामुळे अवघ्या २७ दिवसांच्या चित्रीकरणानंतर थांबलेल्या या चित्रपटाचे काम सुरू व्हायला आणखी काही वर्ष वाट पाहावी लागली.
पहिलाच चित्रपट असल्याने तो सुरू व्हायच्या आधी दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर आपली घट्ट मैत्री झाली होती, असे त्याने सांगितले. ‘माझ्यासाठी तो अनुभव खूप तणावाचा होता. तुम्ही तुमच्या दिग्दर्शकाबरोबर एक ते दीड वर्ष सातत्याने संवाद साधत असता, प्रत्येक दिवस तुमचा त्यांच्या सहवासात व्यतीत होत असतो. त्यामुळे एक मैत्रीपूर्ण नाते तयार होते. मी तेव्हा त्यांना सतत विचारायचो, ‘तुम्ही पहिले हा चित्रपट का पूर्ण करत नाही?’ पण ‘बँडिट क्वीन’ ही त्यांच्यासाठी त्यावेळी खूप मोठी संधी होती’ असे बॉबीने सांगितले. एक काळ एकापाठोपाठ एक चांगले चित्रपट केल्यानंतर मनासारख्या भूमिका मिळणे कमी झाले. आणि चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय बॉबीने घेतला. आपल्याला पुन्हा मुख्य चित्रपटांच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय तो अभिनेता सलमान खानला देतो. ‘मी त्याच्याबद्दल अनेकदा विचार करतो. सलमानने मला एकदा फोन करून विचारले, ‘मामू शर्ट उतारेगा?’ त्यावेळी मी काहीही करेन असे उत्तर त्याला दिले होते. त्याने मला ‘रेस ३’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली’ अशी आठवण बॉबीने सांगितली.
हेही वाचा >>>विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा! ‘द कश्मीर फाईल्स’नंतर महाभारतावर बनवणार चित्रपट, पोस्टर प्रदर्शित
प्रत्यक्षात ‘रेस ३’ तिकीट खिडकीवर फारसा यशस्वी ठरला नव्हता. मात्र त्या चित्रपटाने बॉबीला इतर चित्रपटांतून कामाच्या संधी दिल्या. ‘मी खूप वर्ष काम केले नव्हते, त्यामुळे नवी पिढी मला ओळखणार नाही याची कल्पना मला होती. पण मी सलमानच्या चित्रपटातून काम करतो आहे म्हटल्यावर कित्येक प्रेक्षक माझे काम पाहणार हे मला लक्षात आले होते. त्यामुळे त्या चित्रपटाने फार काही यश मिळाले नसले तरी लोक मला पुन्हा ओळखायला लागले’ असे त्याने सांगितले. ‘रेस ३’ चित्रपटामुळे ‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटात काम करायची संधी मिळाली. कलाकार म्हणून मी फार आनंदी नव्हतो, मला आव्हानात्मक भूमिका मिळाल्या नव्हत्या, पण मला वेगवेगळय़ा भूमिका मिळत गेल्या. आणि काम करता करता मला ‘क्लास ऑफ ८३’ सारखा उत्तम चित्रपट मिळाला. आणि पुढे ‘आश्रम’ने इतिहास घडवला, असे बॉबीने सांगितले. बॉबी देओल लवकरच ‘अॅनिमल’ चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मी ‘बरसात’साठी खूप लवकर तयारीला लागलो होतो. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. आणि २२ व्या वर्षी मी या चित्रपटावर काम सुरू केले होते. शेखर कपूर यांनी चित्रपट सोडल्यानंतर राजकुमार संतोषी यांची दिग्दर्शक म्हणून नियुक्ती झाली. शेखर कपूर बाहेर पडल्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू व्हायला एक वर्षभराहून अधिक काळ वाट पाहावी लागली. त्यानंतरही प्रत्यक्ष चित्रपट पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष लागली. पटकथेत सतत बदल होत होते. आणि त्या बदलांच्या अनुषंगाने कुठे धावायला शिक, ड्रम वाजवण्याचे प्रशिक्षण, बाईक चालवण्याचे प्रशिक्षण घे असे त्या व्यक्तिरेखेला आवश्यक अशी प्रत्येक गोष्टी शिकण्याची धावपळ मला करावी लागली. एकंदरीतच तो सगळा अनुभव त्रासदायक होता.