एनसीआरमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, एक नवीन वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर अनेक प्राणीप्रेमींनी या निर्णयाला विरोध केला आहे. यात अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारांचाही समावेश आहे. अनेक बड्या सेलिब्रिटींनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
बॉलीवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकृतींमधूनही प्राणीप्रेम व्यक्त केलं गेलं आहे. माणसाचं पाळीव प्राण्यांबरोबरचं खास नातं बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधून हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया, बॉलीवूडमधील प्राणीप्रेमावर आधारित काही सिनेमे…
१. एंटरटेनमेंट (Entertainment) : अक्षय कुमार आणि एका गोड Golden Retriever श्वानाची प्रमुख भूमिका असलेला हा विनोदी चित्रपट आहे. या श्वानाला वारशाने अमाप संपत्ती मिळालेली असते, त्यामुळे अक्षयला त्याच्या वडिलांची मालमत्ता मिळवण्यासाठी या श्वानाबरोबर संघर्ष करावा लागतो. हसवता हसवता हा चित्रपट निष्ठा, प्रेम आणि पाळीव प्राणी व त्यांच्या मालकामधील अनोख्या नात्याची जाणीव करून देतो.

२. चिल्लर पार्टी (Chillar Party) : सलमान खान निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट काही मुलांच्या साहसी गोष्टीवर आधारित आहे. ते ‘भिडू’ नावाच्या एका भटक्या श्वानाला वाचवण्यासाठी लढा देतात. प्राण्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे शिकवणारा हा एक चित्रपट आहे.

३. हम आपके हैं कौन (Hum Aapke Hain Koun) : या ब्लॉकबस्टर कौटुंबिक चित्रपटात ‘टफी’ नावाचा गोंडस पॉमेरेनियन श्वान महत्त्वाची भूमिका बजावतो. टफी या चित्रपटात नसता, तर चित्रपटाचा शेवट आनंदी झाला नसता. चित्रपटात एका महत्त्वाच्या वळणावर टफी निशाचं (माधुरी दीक्षित) पत्र प्रेमऐवजी राजेशपर्यंत पोहोचवतो, तेव्हा तो लाखो रसिकांचंही प्रेम मिळवतो. त्यामुळे सिनेमातील कलाकारांबरोबरच टफीही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.

४. दिल धडकने दो (Dil Dhadakne Do) : झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’मध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात आला. एका श्वानाला आमिर खानचा आवाज देत चित्रपटातल्या मेहरा कुटुंबातला सदस्य दाखवण्यात आला. प्लूटो केवळ पाळीव प्राणी नाही, तर तो घरातील एक सदस्यच आहे. हा श्वान चित्रपटातल्या पात्रांची ओळख करून देतो. अनिल कपूर, प्रियांका चोप्रा आणि रणवीरसिंह या कलाकारांसह प्लुटोही सर्वांचं लक्ष वेधून घेतो.