गेल्या काही दिवसांत बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी गुडन्यूज दिल्या आहेत. तसंच काही कलाकार लवकरच आनंदाची बातमी देणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने दुसऱ्यांदा आई झाल्याची खुशखबर दिली होती. तसंच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हेसुद्धा लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता अरबाज खाननेही बाबा असणार असल्याची आनंदवार्ता दिली.
अशातच आता बॉलीवूडचं आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहे, हे कपल म्हणजे अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा. राजकुमार राव आणि पत्रलेखा हे दोघं लवकरच आई-बाबा होणार असून याबद्दलची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली आहे.
राजकुमार रावने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ‘Baby on the way असं लिहिलं आहे. तसंच या पोस्टवर ‘राजकुमार आणि पत्रलेखा’ असं दोघांचं नावही लिहिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये फक्त ‘खूप आनंदी’ असं म्हटलं आहे. त्यामुळे आई-बाबा होणार असल्याच्या आनंदी भावना दोघांनी अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
राजकुमार राव आणि पत्रलेखा इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, राजकुमार आणि पत्रलेखा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दोघांच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलीवूड कलाकारांनी सुद्धा दोघांना आई-बाबा होणार असल्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोघांचं कौतुक केलं आहे.
राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ऑक्टोबर २०२१ मध्ये राजकुमारने पत्रलेखाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी चंदीगडमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्याआधी राजकुमारने पत्रलेखाला पहिल्यांदा एका जाहिरातीत पाहिलं होतं आणि त्याचक्षणी ही आपली जीवनसाथी असल्याचं त्याने ठरवलं होतं.
२०१४ मध्ये आलेल्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एकत्र काम केलं आहे. दोघांचे अनेक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राजकुमारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘मलिक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या ११ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.