Bollywood Actors Vanity Van’s Demand : मनोरंजनसृष्टी आता बरीच ग्लॅमरस झाली आहे. त्यामुळे या ग्लॅमरनुसार, कलाकारांच्या मागण्याही वाढल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. या मागण्यांपैकी प्रमुख आणि खर्चीक मागणी म्हणजे व्हॅनिटी व्हॅन. कलाकारांच्या याच व्हॅनिटी व्हॅनच्या मागणीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाने पोलखोल केली आहे आणि ही एक समस्या असल्याचंही म्हटलं आहे.
सायरस ब्रोचाच्या पॉडकास्टवर या शोमध्ये दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्यांचा ४० वर्षांचा इंडस्ट्रीतील अनुभव सांगताना काही गोष्टी शेअर केल्या. तेव्हा त्यांनी म्हटलं की, सध्या काही कलाकार असे आहेत जे चक्क सात व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात आणि या प्रत्येक व्हॅनचं ठरावीक काम असतं. या सगळ्याचा खर्च अर्थातच निर्मात्यालाच करावा लागतो.
संजय गुप्ता म्हणाले, “माझ्या ओळखीचे काही कलाकार आहेत ज्यांच्याकडे सहा व्हॅनिटी व्हॅन्स असतात. एक व्हॅन फक्त त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी असते – ते तिथे आराम करतात. दुसऱ्या व्हॅनमध्ये ते मेकअप आणि हेअर करतात. तिसऱ्या व्हॅनमध्ये मीटिंग घेतात. चौथ्या व्हॅनमध्ये जिम असते, तिथे ते व्यायाम करतात. जिम असली की, ट्रेनर, असिस्टंट, व्हॅन ड्रायव्हर वगैरे लागतात. म्हणजे एका व्हॅनसाठीच सहा लोक लागतात.”
यापुढे ते सांगतात, “पाचव्या व्हॅनमध्ये जेवण तयार होत असतं. त्यासाठी एक शेफ सेटवर असतो. सहाव्या व्हॅनमध्ये स्टाफ बसतो आणि जर ते जोडपं असेल, म्हणजे दोघंही कलाकार असतील, तर प्रत्येकाची वेगळी ‘किचन व्हॅन’ असते. म्हणजे एकूण ११ व्हॅन सेटवर येतात. घरी एकत्र जेवतात ना? मग सेटवर वेगळं का?”
संजय गुप्ता पुढे सांगतात, “फक्त अमिताभ बच्चन हे असे कलाकार आहेत जे कधीच निर्मात्याकडून त्यांच्या स्टाफसाठी पैसे घेत नाहीत. ते म्हणतात, ‘हा माझा स्टाफ आहे, निर्मात्याने त्यांची जबाबदारी का घ्यावी?’ त्यांचे मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर, ड्रायव्हर – यांचे पैसे अमिताभ स्वतःच देतात.”
आधीच्या परिस्थितीबद्दल संजय गुप्ता म्हणाले की, पूर्वी जिथे फक्त २-३ लोकांची टीम असायची. तिथे आता चक्क ३० लोकांची टीम तयार झाली आहे. गेल्या काही वर्षांतील आर्थिक संकट आणि फ्लॉप चित्रपटांमुळे निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शक सगळेच या अनावश्यक खर्चांविरोधात आवाज उठवत आहेत.