Shilpa Shirodkar : सोनाक्षी सिन्हा सुधीर बाबू यांच्या प्रमुख भूमिका असलेला जटाधरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येतो आहे. चित्रपटाचा टिझर आल्यापासून चित्रपटाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान या चित्रपटाचं एक पोस्टर समोर आलं आहे ज्यातून एका अभिनेत्रीने कमबॅक केल्याचं दिसून येतं आहे. त्या अभिनेत्रीचा खतरनाक लूक या पोस्टरद्वारे समोर आला आहे.

जटाधरा मधली अभिनेत्री कोण?

जटाधरा चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणीही नसून शिल्पा शिरोडकर आहे. शिल्पा शिरोडकरची भीती वाटेल असा तिचा हा लूक या पोस्टरवर दिसतो आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार जटाधरा सिनेमात शिल्पा शिरोडकर शोभा नावाच्या महिलेची भूमिका साकारते आहे. मोह आणि स्वार्थ काय असतो? त्यासाठी एखादी महिला कुठल्या थराला जाऊ शकते? असं या शोभाचं म्हणजेच शिल्पा शिरोडकरचं पात्र या सिनेमात आहे. शिल्पाने स्वतः हे पोस्टर पोस्ट करत चित्रपटात तिची भूमिका असल्याचं सांगितलं आहे.

काय आहे पोस्टरमध्ये?

नव्या पोस्टरवर शिल्पा शिरोडकर काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिच्या बाजूला एक हवनकुंड आहे. हवनकुंड पेटलेलं असताना शिल्पा शिरोडकर जीभ बाहेर काढते आहे असं हे पोस्टर आहे. तिच्या आजबाजूला मानवी हाडं, सापळा, कवट हेदेखील दिसतं आहे आणि दिवेही लागलेले आहेत. कदाचित शिल्पा शिरोडकर यात मांत्रिकाच्या भूमिकेत आहे. तिच्या पात्राचं नाव शोभा असलं तरीही ती भूमिका नेमकी काय हे स्पष्ट नाही ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. शिल्पा शिरोडकर ही नव्वदच्या दशकात गाजलेली अभिनेत्री आहे. त्यावेळी तिने गोविंदा, चंकी पांडे यांच्यास अनेक नायकांबरोबर काम केलं आहे. शिल्पा आता चित्रपटातून कमबॅक करते आहे. तिच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काय आहे जटाधरा चित्रपटाची कहाणी?

जटाधरा हा एक पौराणिक चित्रपट आहे. भारतीय पौराणिक कथांवर आधारित एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देवीच्या भूमिकेत आहे. तर सुधीर बाबू हा नायक आहे. चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे ज्यात सोनाक्षीचा रुद्रावतार दिसून येतो आहे. जटाधरा या चित्रपटाचं दिग्दर्शन शिविन नारंग यांनी केलं आहे. तर निर्मिती प्रेरणा अरोरा यांनी केली आहे. परी, रुस्तम, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटांची निर्मितीही त्यांनीच केली होती. या वर्षाखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटातून शिल्पा शिरोडकरने कमबॅक केलं आहे.